Harshil Tomar Start Up Success Story: सहा महिन्यांपूर्वी अमेरिकन कंपनीने नोकरीवरून काढून टाकलेल्या हर्षिल तोमर याने प्रतिकूल परिस्थितीचे यशात कसे रूपांतर केले, याचा प्रेरणादायी अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मार्चमध्ये नोकरी गमावलेल्या या तरुण उद्योजकाने ऑक्टोबरपर्यंत ४४ लाख रुपये कमाई करणाऱ्या स्टार्टअप कंपनीची स्थापना केली आहे. या तरुण संस्थापकाने ‘एक्स’वर आपला प्रवास सांगितला आणि म्हटले की, एका नियमित मीटिंगदरम्यान त्याला अमेरिकेतील कंपनीने रिमोट (वर्क फ्रॉम होम) नोकरीवरून काढून टाकले होते, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीचा मार्गच बदलला.

“मी माझ्या स्टार्टअपवर जास्त लक्ष केंद्रित करत होतो, म्हणून त्यांनी १३ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या मीटिंगमध्ये मला नोकरीवरून काढून टाकल्याचे सांगितले. मी त्यांना विनंती केली की, शक्य असल्यास मला आणखी एक संधी द्यावी, जेणेकरून मी चांगले आणि वेगाने काम करू शकेन. पण दुर्दैवाने त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला होता”, असे हर्षिल तोमर या तरुणाने आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे.
“नोकरी गेल्यानंतर पुढील १०-१५ दिवस मी माझ्या स्वप्नाच्या मागे धावावे की पुन्हा सुरक्षित नोकरी शोधावी, याबद्दल गोंधळलेल्या अवस्थेत होतो. मी माझ्या सर्व मित्रांना रेफरल्ससाठी विचारले आणि सुदैवाने मला नोकरी मिळवून देतील असे फारच कमी मित्र होते”, असे हा तरुण म्हणाला.
“शेवटी मी निर्णय घेतला. आता कमी खर्चात जगण्याचा आणि या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढायचा ठरवले. दररोज जेवढा वेळ मी सुरक्षिततेच्या शोधात घालवेन, तेवढेच माझे आयुष्य मला धोक्यांपासून दूर राहायला शिकवेल. एक वर्ष गेले, तर भाडे द्यावे लागेल. अजून एक वर्ष गेले, तर घर घेण्यासाठी वेळ होईल आणि पुढे आणखी वर्ष गेले तर लग्नास थोडा उशीर होईल. म्हणून मी ठरवले की, आता काहीतरी वेगळे करायचेच”, असे हर्षिल तोमरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या सगळ्या गोष्टी घडत असताना, तरुणाच्या पालकांना अद्याप त्यांच्या मुलाची नोकरी गेल्याची पुसटशीही कल्पना नव्हती. हर्षिल तोमर म्हणाला, “आजही माझ्या पालकांना मी नोकरी करत आहे असे वाटते. अशा परिस्थितीला सामोरे जाणे कुटुंबियांसाठी खूपच भयानक असू शकते, म्हणून मी हा निर्णय त्यांना न सांगण्याचे ठरवले होते.”
तो पुढे म्हणाला, “या सहा महिन्यांत मी सर्व चढ-उतार पाहिले आहेत. सुरुवातीला आमच्याकडे एकही क्लायंट नव्हता. पण, आज आम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्ससोबत काम करत आहोत. या प्रवासाने मला आयुष्यात कधीही न शिकलेल्या गोष्टी शिकण्याची संधी दिली आहे.”

पोस्टच्या शेवटी हा तरुण म्हणाला की, “आज आमचे स्टार्टअप ५०,००० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ४४ लाख रुपये) उत्पन्न गाठून पुढचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज आहे. १ ते १० लोकांची आमची पहिली टीम तयार होत आहे, जी आमचे स्वप्न पुढे नेणार आहे. मागील काही महिन्यांत आमचे मासिक उत्पन्न वाढले आहे. आम्हाला ‘एक्स’वर स्पॉन्सर मिळाले आहेत आणि एका प्रतिष्ठित रेसिडेन्सी प्रोग्रामसाठी आमची निवड झाली आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे, आज मी माझे स्वतःचे SaaS प्रोडक्ट तयार करत आहे.”