Mother Taking Kids to School on Bicycle Video: आई… या शब्दातच किती गोडवा, किती ममता आणि किती ताकद दडलेली आहे. आईची परिभाषा कुणी केलीच नाही. कारण- ती परिभाषा शब्दांत मावूच शकत नाही. आई म्हणजे नि:स्वार्थी प्रेम, दयाळूपणा आणि त्यागाचं मूर्तिमंत रूप. आपल्या लेकरांच्या हितासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. म्हणूनच तिला जगातील सर्वांत मोठी योद्धा म्हटलं जातं.
आई या एका शब्दात संपूर्ण जग सामावलंय. तिचं प्रेम नि:स्वार्थी आहे आणि तिचं त्यागमूल्य अमूल्य आहे. अनेकदा आपण आईच्या कष्टाकडे दुर्लक्ष करतो; पण सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओनं सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक साधीसरळ आई दिसते. उन्हाच्या तप्त झळा अंगावर घेत, घामानं भिजलेली ही आई सायकलवर आपल्या दोन मुलांना बसवून शाळेकडे निघाली आहे. कष्टाची कमाई करणाऱ्या या महिलेच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी लेकरांसाठी तिच्या मनात अपार उमेद आहे. ही दृश्यं पाहता क्षणी कुणाच्याही डोळ्यांत पाणी येणारच.
मन हेलावून टाकणारा प्रसंग
व्हिडीओत दिसतं की, ती आई मोठ्या संघर्षानं पेडल मारत आहे. सायकल पुढे नेण्यासाठी तिला किती मेहनत करावी लागत असेल, हे पाहून मन द्रवून जातं. पण त्या आईच्या डोळ्यांत एकच स्वप्न आहे – तिची मुलं शिकली, वाचली आणि उभी राहिली पाहिजेत. आपण बघतो ते तसं पाहिलं तर फक्त एक व्हिडीओतील दृश्य आहे; पण त्या दृश्यातील आईमध्ये किती कष्ट, किती त्याग आणि किती जिवापाड माया दडलेली आहे, याची जाणीव झाल्यावर अंगावर काटा येतो.
नेटकऱ्यांचे पाणावले डोळे
या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांच्या भावना शब्दांतून ओसंडून वाहताना दिसतात.
एक जण लिहितो, “आईचं उत्तर नाही, तिच्या प्रेमाला तोड नाही.” दुसरा म्हणतो, “आई म्हणजे खरी योद्धा… तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही अशक्य आहे.” आणखी एक कमेंट होती, “मांजर असो वा माणूस, आईची माया सगळ्यात श्रेष्ठ.”
या व्हिडीओवर आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लाइक्स आले असून, लोकांनी रेड हार्ट व क्राईंग इमोजींचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सनी तर सरळ लिहिलं – “माझ्या आयुष्यातली खरी हीरो माझी आईच आहे.”
येथे पाहा व्हिडीओ
एक साधा दिसणारा हा व्हिडीओ प्रत्यक्षात लाखो लोकांच्या हृदयाला भिडतोय. कारण- जगात कितीही बदल झाले तरी एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ती म्हणजे आईचं नि:स्वार्थी प्रेम. म्हणूनच म्हणतात, “आईसारखी योद्धा या पृथ्वीतलावर दुसरी कुणीच नाही!”