Heart Touching Video : शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोण असेल ना, तर तो बैल असतो. शेतातील अनेक कामे तो विनातक्रार करत असतो. मालकासाठी ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता, तो बाराही महिने शेतात राबायला तयार असतो. मातीला कष्टाशिवाय आणि शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही, असे म्हटले जाते. शेतकरीही त्याच्या बैलावर आपल्या मुलांइतकेच जीवापाड प्रेम असतो. त्याला काही दुखलं, खुपलं, तर त्याची काळजी घेत असतो. त्यामुळे बैलाचाही आपल्या मालकावर जीव असतो. पण, तोच मालक अचानक सर्वांना सोडून निघून गेला, तर त्या बैलाची काय अवस्था होत असेल याची कधी कल्पना केली आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एका बैलाचा अतिशय भावनिक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातून मुक्या प्राण्यांनाही माया कळते, त्यांनाही ह्रदय असते, याची जाणीव होईल.

मालकाच्या आठवणीने बैलाचा जीव झाला कासावीस

प्राणी मुके असल्याने ते बोलू तर शकत नाहीत; पण त्यांच्या डोळ्यातील भाव खूप काही गोष्टी सांगून जातात. या व्हिडीओतूनही मुक्या प्राण्याचे आपल्या मालकावर किती प्रेम आहे याचा प्रत्यय येईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बैल आपल्या मृत मालकाच्या फुलांनी सजविलेल्या फोटोसमोर उभा आहे. मालकाच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्याच्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. मालकाच्या आठवणीने त्या बैलाचा जीव कासावीस झालाय. आपला मालक आपल्याला प्रत्यक्षात का दिसत नाही, असा प्रश्न त्याला सतावतो आहे.

“तुमच्याशिवाय आयुष्य कसे काढू आता मालक तुम्ही सांगा समोर येऊनी”

बैलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ @naad_ekch_bailgada_sharyaticha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लिहिण्यात आलेय, “आपल्या मालकासाठी अश्रू ढाळणारा महादेवाचा नंदी महाराष्ट्र किंग सोना.” तर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘आठवण आली की डोळ्यांत येते पटकन पाणी, तुमच्याशिवाय आयुष्य कसे काढू आता मालक तुम्ही सांगा समोर येऊनी, मालकाच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या बैलाच्या जीवाची होत असलेली घालमेल या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतेय.

आनंद महिंद्रा आईच्या आठवणीने झाले भावूक, ४७ वर्षे जुना PHOTO पोस्ट करत म्हणाले, ‘तुझी स्वप्न…”

बैलाच्या या भावनिक व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, डोळ्यांत बघितल्यावरच कळले की, मालकाने किती जीव लावला असेल; नि:स्वार्थी प्रेम. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, माणसापेक्षा जनावर केलेल्या प्रेमाची जान ठेवते. तिसऱ्या युजरने लिहिले की, त्याचे त्याच्या मालकावर असलेले प्रेम त्याच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसून येतेय. आणखी एका युजरने लिहिले की, जेवढी माया अन् प्रेम मुक्या जनावरांना मिळतं त्याच्या दुप्पट ते आपला जीव ओवाळून टाकतात हो. तर अनेकांनी हा अतिशय भावनिक व्हिडीओ असल्याचे म्हणत कमेंट्समध्ये रडण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.