एप्रिल मे महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊन गेले आहेत. घराबाहेर पाय ठेवणं देखील कठीण होऊन जातं. उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होते. दोन ते तीन मिनिटात अंग घामाने भिजून जातं. यंदाही तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यात लग्नसराईचं धूम सुरु असल्याने नातेवाईकांकडे लग्नाला जाणंही तितकंच महत्वाचं आहे. काही लग्नांचा मुहूर्त दुपारचा असल्याने लग्नाला जावं की नाही असा प्रश्न पडतो. पण नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबियांनी यावर लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. उष्णतेची लाट देखील भारतीयांना त्यांच्या परंपरा आणि समारंभ साजरे करण्यापासून रोखू शकत नाही असं दिसते. व्हायरल व्हिडीओत संपूर्ण मांडव नवरदेवासह नवरीकडे जाताना दिसत आहे.

व्हिडीओ सुरतचा असून @Chopsyturvey या ट्विटर खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. “वरातीला उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून चालता मांडव. चांगली कल्पना”. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या अंदाजात प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, “भारतीय जुगाडचे कौतुक”. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “उष्णतेची लाट? भारतीय लग्न थांबवू शकत नाही.” तर काही जणांनी यामुळे वाहतूककोंडी होईल म्हणून आक्षेप घेतला आहे.

भारताच्या हवामान खात्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यासह किमान पाच राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशातील काही भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. वायव्य भारतात १२२ वर्षांतील सर्वात उष्ण मार्च नोंदवला गेला आहे. सरासरी कमाल तापमानाने २००४ मधील मागील ३०.६७ अंश सेल्सिअसच्या विक्रमाला मागे टाकले.