Hiker falls to death after untying safety rope for photograph Video : चीनमधील सिचुआन येथील माउंट नामा (Mount Nama) वर एका गिर्यारोहकाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिखरच्या जवळ पोहचल्यानंतर या गिर्यारोहकाने फोटो काढण्यासाठी आपली ‘सेफ्टी रोप’ काढली आणि तो खाली कोसळला अशी माहिती दिली जात आहे.
‘चॅनल न्यूज एशिया’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे, त्यानुसार ३१ वर्षीय हाँग हा २५ सप्टेंबर रोजी १८३३२ फूट (५५८८ मीटर) उंचीचा पर्वत सर करणाऱ्या गिर्यारोहकांच्या गटाचा सदस्य होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हाँगने आपली सेफ्टी रोप काढली होती आणि तो बर्फावरून तो निसटला आणि उतारावून घरंगळत गेला. ही घटना घडली तेव्हा तो त्याची आईस ॲक्स वापरत नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसून येत आहे की, शिखराच्या जवळ बर्फाच्छादित उतारावर हाँग हा सेफ्टी रोपशिवाय उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तो घसरला आणि दुसऱ्याच क्षणाला तो डोंगरावरून घसरत खाली गेला आणि कड्यावरून दिसेनासा झाला. यावेळी दुसरे गिर्यारोहक प्रचंड घाबरल्याचे दिसत आहेत.
चायनीज मीडिया आउटलेट ‘रेड स्टार न्यूज’ दिलेल्या वृत्तानुसार, दोरी सोडल्यानंतर उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना तो त्याच्या कॅम्पॉन्सला अडखळला, दरम्यान अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.
नातेवाईकांनी सीएनएला सांगितले की तो पहिल्यांदाच या पर्वतावर गेला होता आणि अंदाजे ३२८ ते ६५६ फूट (१००-२०० मिटर) खाली कोसळला. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने त्याला वाटवण्यासाठी तात्काळ मोहिम सुरू केली. दरम्यान माउंट नामा हा सिचुआन प्रांतातील पूर्व तिबेटच्या पठारावर एक उंच पर्वत आहे. तो गोंग्गा पर्वतरांगेचा (Gongga Mountain Range) एक भाग आहे.