आपल्या आजूबाजूला अनेक अशा घटना घडत असतात, ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो. पैशांना अधिक महत्त्व प्राप्त झालेले असताना माणुसकी विसरलेले अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पैशांच्या मोहापलीकडे जाऊन समाजकार्य करणारेही कमी नाहीत. बंगळुरूमधील एक तरूण व्यावसायिक आणि खेळाडू असलेल्या चिन्मय हेगडे यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनुभव स्वरुपात असलेली ही छोटीशी कथा एका विद्यार्थीनीच्या आयुष्यात प्रकाश आणणारी तर आहेच, शिवाय त्यातून अनेकांना सकारात्मकतेचा संदेश मिळत आहे.

हेगडे यांच्याबरोबर काय घडलं?

चिन्मय हेगडे यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या बँक खात्यात एका आंतरराष्ट्रीय बँक खात्यातून ५० हजारांची रक्कम जमा झाली. एवढी मोठी रक्कम अनोळखी खात्यातून आल्यामुळे ते गोंधळून गेले. त्यामुळे बँकेत जाऊन चौकशी केली असता सौदी अरेबियातील रिझवान नामक इसमाच्या खात्यातून सदर रक्कम आल्याचे कळले.

हेगडे यांनी पुढे म्हटले की, बँक खात्याच्या क्रमाकांत छोटीशी चूक केल्यामुळे माझ्या खात्यात चुकून ती रक्कम जमा झाली. मी रिझवानला फोन केला असता तो रडायला लागला. हे पैसे त्याच्या कुटुंबियांना पाठवा म्हणून तो गयावया करू लागला. मी त्याला खात्री दिली की, हे पैसे त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचतील.

सदर पैसे रिझवानच्या कुटुंबियांनाच मिळतायत की नाही याची खातरजमा करण्यासाठी चिन्मय हेगडे यांनी स्वतःहून त्याच्या कुटुंबियांची भेट घ्यायचे ठरवले. तिथे गेल्यावर रिझवानच्या कुटुंबाची गरिबी पाहून त्यांचे अंतर्मन हलले. रिझवानचे वडील व्हिलचेअरवर होते. ते बांधकाम मजूर होते. इमारतीचे काम करत असताना ते तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले, तेव्हापासून त्यांची ही अवस्था आहे, असे रिझवानच्या वडिलांनी सांगितले.

रिझवानने बी.कॉमला ९२ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर तो कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी सौदी अरेबियात नोकरीसाठी निघून गेला. त्याच्या लहान बहिणीला खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत टाकले. कारण तिचे शैक्षणिक शुल्क भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते.

चिन्मय हेगडे यांनी हा सर्व प्रकार स्वतःच्या कुटुंबियांना सांगितला. दुसऱ्या दिवशी चिन्मयच्या बाबांनी रिझवानच्या कुटुंबाची पुन्हा भेट घेण्याचा आग्रह धरला. हेगडे या प्रसंगाबाबत म्हणाले, “माझ्या बाबांनी रिझवानच्या लहान बहिणीचा शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. तिला पुन्हा तिच्या खासगी शाळेत टाका, असे सांगितले. तसेच मला सांगितले की, प्रत्येक महिन्याला तिला काय हवं नको ते बघ.”

शुक्रवारी कर्नाटक बोर्डाच्या दहावीचे निकाल लागले. रिझवानच्या बहिणीला ९७ टक्के गुण मिळाले आहेत. ६२५ गुणांपैकी तिने ६०६ गुण मिळवले आहेत. निकाल लागल्यानंतर तिने सर्वात आधी मला फोन केला आणि धन्यवाद दिले. ती म्हणाले, “मी माझ्या सख्या भावाच्या आधी तुम्हाला फोन करत आहे. तूही माझ्या खऱ्या भावाइतकाच महत्त्वाचा आहेस.” हेगडे पुढे म्हणाले, माझ्या भावना मला शब्दात मांडता येत नाहीयेत. एका चुकीचं फलीत एका चांगल्या कामात परावर्तित झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर पोस्ट एक्सवर चांगलीच व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी सदर पोस्ट लाईक केली असून त्यावर हजारो लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.