Gemini app safe to use?: सोशल मीडियावर अलीकडेच एक नवीन एआय ट्रेंड जोर धरत आहे. जेमिनीच्या नॅनो बनाना आणि व्हिंटेज साडी एआय फोटो एडिट्सने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडमध्ये लोक स्वतःचे फोटो किंवा सेल्फी एआयच्या मदतीने बदलून आकर्षक व स्टायलिश प्रतिमा तयार करीत आहेत. विशेषतः व्हिंटेज साडी फोटो एडिट्समध्ये पारंपरिक साड्या घाललेल्या स्त्रिया जुन्या चित्रपटांच्या किंवा क्लासिक थीम असलेल्या पार्श्वभूमीवर दाखवल्या जातात.

⦁ नॅनो बनाना म्हणजे काय?

गूगलच्या जेमिनी नॅनो मॉडेलवर आधारित नॅनो बनाना हा एक एआय फोटो-एडिटिंग पर्याय आहे. त्यात सेल्फी किंवा फोटोचे 3D प्लास्टिकसारखे टॉय लूकमध्ये रूपांतर केले जाते. फोटोमध्ये डोळे मोठे, चेहऱ्याचा आकार वाढवला जातो आणि संपूर्ण प्रतिमा कार्टूनसारखी दिसते. या ट्रेंडची लोकप्रियता इतकी वाढली की, लोकांनी याचा वापर करून पारंपरिक साडी घाललेल्या व्हिंटेज पोर्ट्रेट्सदेखील तयार करायला सुरुवात केली.

⦁ जेमिनी नॅनो सुरक्षित आहे का?

गूगल आणि ओपन एआयसारख्या तंत्रज्ञान कंपन्या सांगतात की, त्यांनी फोटो अपलोड करताना काही सुरक्षा उपाय प्रदान केले आहेत. पण, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्रतिमांची सुरक्षा व्यक्तिगत सवयी आणि ते फोटो पाहणाऱ्यांचे हेतू यांवरही अवलंबून असते. जेमिनी नॅनो बनानाद्वारे तयार केलेल्या फोटोमध्ये SynthID नावाचा अदृश्य डिजिटल वॉटरमार्क आणि मेटाडेटा टॅग्स असतात. हे वॉटरमार्क आणि टॅग्स एआयने तयार किंवा एडिट केलेले फोटो ओळखण्यासाठी वापरले जातात, असे गूगलच्या aistudio वेबसाइटवर म्हटले आहे.

⦁ वॉटरमार्क खरोखर कार्य करतो का?

SynthID वॉटरमार्क डोळ्यांना दिसत नाही; पण विशिष्ट डिटेक्शन टूल्सच्या मदतीने फोटो एआयने तयार केलेला आहे की नाही हे तपासता येते, असे spielcreative.com मध्ये सांगितले आहे. मात्र, Tatler Asia नुसार, हे टूल सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. तसेच, नकली वॉटरमार्क वापरला जाऊ शकतो, तो काढला जाऊ शकतो. किंवा दुर्लक्षित केला जाऊ शकतो. वायर्डने रिअॅलिटी डिफेंडरचे सीईओ बेन कोलमन यांना सांगितले आहे की, त्यांचे “वास्तविक जगातील अनुप्रयोग सुरुवातीपासूनच अपयशी ठरतात.

यूसी बर्कलेचे प्राध्यापक हॅनी फरीद यांनी वायर्डला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फक्त वॉटरमार्किंग पुरेसे असेल, असे कोणालाही वाटत नाही. त्यांनी असेही म्हटले की, वॉटरमार्किंगसह इतर तंत्रज्ञान वापरल्यास फेक फोटो तयार करणे कठीण होईल.

⦁ फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?

सोशल मीडियावर जेमिनीचा नॅनो बनाना आणि व्हिंटेज साडी हे ट्रेंड लोकप्रिय होत असले तरी त्यामध्ये फोटो सुरक्षितता आणि धोकेही दडलेले आहेत. त्यामुळे संवेदनशील किंवा खासगी फोटो अपलोड करणे टाळणे महत्त्वाचे ठरते. फोटो टाकण्यापूर्वी लोकेशन टॅग किंवा डिव्हाइसशी संबंधित माहिती काढून टाकल्यास गैरवापराची शक्यता कमी होते. त्याशिवाय आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील प्रायव्हसी सेटिंग्ज नीट तपासून फक्त निवडक लोकांनाच कंटेंट पाहता येईल याची काळजी घ्यावी. मूळ फोटो जतन करून ठेवणेही गरजेचे आहे,जेणेकरून त्यात कोणतेही बदल केले गेले किंवा त्या फोटोचा चुकीचा वापर झाल्यास ते ओळखणे सहज शक्य येईल.

Google trends Gemini photo

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करतो, तेथील नियम व अटी नीट समजून घ्याव्यात. कारण- काही प्लॅटफॉर्म अपलोड केलेल्या प्रतिमांवर हक्क सांगतात किंवा त्या प्रतिमा एआय ट्रेनिंगसाठी वापरतात.