केरळच्या त्रिशूर जिल्ह्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झालेली तरुणी मदुराई जिल्ह्यामध्ये सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला स्वइच्छेने तिच्या प्रेयसीसोबत पळून गेली होती. समलैंगिक संबंधांच्या या प्रकरणामधील तपशील पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पत्नी बेपत्ता झाल्याचं समजताच एका दिवसापूर्वी तिच्यासोबत लग्नबंधनात अडकलेल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी करावी लागली.
नवऱ्याला हार्ट अटॅक…
एकीकडे नवरा मुलगा हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढत असतानाच दुसरीकडे पोलीस आणि या दोघांचेही नातेवाईक या तरुणीचा शोध घेत होते. अखेर बराच शोध घेतल्यानंतर मदुराईमधील एका लॉजमध्ये हे तरुणी तिच्या प्रेयसीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान या तरुणीच्या पतीवरील शस्त्रक्रीया यशस्वी ठरली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सहा दिवस चालला तपास…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या साऱ्या प्रकरणाची उकल सहा दिवसांच्या तपासानंतर झाली. पोलिसांनी त्रिशूरमधील चेरपू येथील पाझूवील गावातील या २३ वर्षीय विवाहित तरुणीला मदुराईमधून तिच्या प्रेयसीसोबत असताना ताब्यात घेतलं.
माहेरकडून सोनं मिळावं म्हणून केलं लग्न…
याहून अधिक थक्क करणारी गोष्ट म्हणजे या तरुणीला आधीपासूनच तिच्या प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा होती. मात्र लग्नामध्ये माहेरच्यांकडून मोठ्याप्रमाणात सोनं मिळेल हे ठाऊक असल्याने तिने लग्न केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी या मुलीचं त्रिशूरमधील चावाकड येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं. मात्र लगेच २५ ऑक्टोबर रोजी या तरुणाने लग्न करुन घरी आणलेली पत्नी दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्थानकात नोंदवली.
बँकेतून पळून गेली…
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चेरपूर येथील एका बँकेत हे दोघे काही कामानिमित्त गेले होते. बँकेमध्ये नवरा काही कामानिमित्त थांबला असताना या तरुणीने त्याच्याकडून त्याच्या मोबाईल मागून घेतला. आपण आपल्या एका मैत्रिणीला भेटून काही वेळात आलोच असं सांगून ही तरुणी दुचाकीवरुन नवऱ्याचा मोबाईल घेऊन निघून गेली पण ती परतलीच नाही.
ट्रेनचं तिकीट अन् बसने प्रवास…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवरा बँकेजवळ त्याच्या पत्नीची सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहत होता. अखेर त्याने सायंकाळी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. तपासामध्ये या तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत चेन्नईला पळून जाण्यासाठी त्याच दिवशी त्रिशूर ते चेन्नई तिकीट बूक केल्याची माहिती समोर आली. मात्र चेन्नईला जाण्याऐवजी या दोघी बसने कोट्टयमला गेल्या. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघी ट्रेनने चेन्नईला गेल्या. त्यानंतर त्या चेन्नईवरुन मदुराईला गेल्या जिथे त्या एका लॉजमध्ये थांबल्या होत्या.
गाडीसाठी पुन्हा त्रिशूरला आल्या…
मदुराईमध्ये एक दिवस राहिल्यानंतर त्या पुन्हा त्रिशूरला परतल्या. रेल्वे स्थानकावर पार्क केलेल्या दुचाकीची व्यवस्था करण्यासाठी त्या परतल्या होत्या. त्यांनी एर्नाकुलम येथे एका पार्कींगच्या ठिकाणी ही दुचाकी लावून १० दिवसाचे आगाऊ पैसे पार्किंगवाल्यांना देऊन ठेवले आणि त्या पुन्हा मदुराईला परतल्या.
महिलेच्या प्रेयसीसंदर्भातील धक्कादायक माहिती…
मदुराईमधील कापड गिरण्यांमध्ये नोकरी करुन येथेच आयुष्य एकत्र काढण्याचा या दोघींचा विचार होता. विशेष म्हणजे तपासादरम्यान या महिलेची प्रेयसीसुद्धा विवाहित असल्याची माहिती समोर आली. या महिलेप्रमाणे तिनेही लग्न करुन आपल्या माहेरकडून दागिने मिळाल्यानंतर पळ काढल्याचं तपासात उघड झालं.