Company Abandoned Employee During Illness: एचआरमध्ये काम करणारे माजी कर्मचारी आणि इन्फ्लुएंसर अविक यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नोकरीच्या ठिकाणी सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्यांना एका कर्मचाऱ्याचा अनुभव शेअर करत इशारा दिला आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी एका तरुण कर्मचाऱ्याची गोष्ट शेअर केली आहे. जो त्याच्या कामातील विविध कौशल्यांमुळे कंपनीत सर्वांचा लाडका बनला होता. पण, जेव्हा तो आजारी पडला तेव्हा त्याच कंपनीने त्याला वाऱ्यावर सोडले.

ऑफिसमधील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर अविक यांनी म्हटले आहे की, हा कर्मचारी ऑफिसमधील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळखला जात असे. प्रत्येक क्लायंट त्याचे कौतुक करत असे, कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील प्रत्येक जण त्याच्यावर विश्वास ठेवत असे आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना त्याचे कौतुक वाटायचे. तो दररोज सकाळी सर्वांच्या आधी लॉगिन करायचा आणि रात्री सर्वांत शेवटी काम बंद करायचा. तो कामाची वेळ संपल्यानंतरही कॉल किंवा ईमेलला नेहमी उत्तर द्यायचा. त्याची कामाप्रती इतकी निष्ठा होती की सर्वांनाच तो महत्त्वाचा वाटू लागला होता.

आजारपणाचा कंपनीच्या कामावर कोणताही परिणाम नाही

एके दिवशी तो कर्मचारी अचानकपणे आजारी पडला. त्याला अंथरुणातून उठता येईना. त्याला गंभीर आजाराचे निदान झाले. या आजारामुळे त्याला दीर्घकाळ रजा घ्यावी लागली. पण, काम करत असताना सर्वांचा लाडका असलेल्या या कर्मचाऱ्याच्या आजारपणाचा कंपनीच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही. कंपनी अगदी सहजपणे पुढे निघून गेली, असे या व्हिडिओमध्ये पुढे सांगितले आहे.

वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झाले

आजारपणात कंपनीने या कर्मचाऱ्याकडे कसे दुर्लक्ष केले याबाबत व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, या कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे कंपनीच्या कामकाजात कोणताही मोठा अडथळा आला नाही, परंतु कर्मचाऱ्याचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. अनिश्चिततेच्या आणि आजारपणाच्या या काळात, फक्त त्याचे कुटुंबच त्याच्या पाठीशी होते. कुटुंबच त्याची काळजी घेत होते आणि भावनिक आधार देत होते. त्याचे सहकारी, कंपनीतील बॉस आणि कंपनी ज्यांच्यासाठी त्याने असंख्य रात्री आणि विकेंड्सचा त्याग केला होता ते कुठेच दिसत नव्हते.

प्रमोशन, पगारवाढ आणि…

एखाद्याचे आरोग्य बिघडत असेल, तर कामाच्या ठिकाणी मिळणारे प्रमोशन, पगारवाढ आणि कौतुकाची ईमेल्स खरोखर किती महत्त्वाच्या असतात, यावर विचार करण्याचे आवाहन या व्हिडिओच्या शेवटी करण्यात आले आहे. व्हिडिओत म्हटले आहे की, कामाच्या ठिकाणी केलेली कामगिरी कितीही मोठी असो, ती मानसिक समाधान, निरोगी आरोग्य आणि कुटुंबाच्या प्रेमापेक्षा जास्त मौल्यवान नाही.