Viral Video :- अनेकदा लहान मुलांना फळं खायला प्रवृत्त करण्यासाठी प्रत्येक आईची धडपड सुरू असते. लहान मुलं अनेकदा मसालेदार, चमचमीत पदार्थ अगदी आवडीनं खातात; पण फळ आणि भाज्या खायला नकार देतात. त्यातचं ‘पिझ्झा’ म्हणजे अगदी सगळ्यांच्याच आवडीचा. मग ती लहान असो किंवा मोठे. कॉर्न पिझ्झा, चिकन पिझ्झा, पनीर पिझ्झा असे अनेक प्रकारचे पिझ्झा तुम्ही आतापर्यंत खाल्ले असतील. पण, तुम्ही कधी फळांचा पिझ्झा खाल्ला आहे का? जो अगदी पौष्टीक असेल. तर आज एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत फळांचा पिझ्झा कसा बनवला जाऊ शकतो हे दाखवण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ गुजरात राज्यातील प्रमुख शहर सुरत येथील आहे; जो एका फूड ब्लॉगरने शेअर केला आहे. सुरतमध्ये एका व्यक्तीचा स्टॉल आहे; जिथे हा फळांचा पौष्टीक पिझ्झा बनवला जातो. हा फळांचा पिझ्झा बनवताना बघून तुमच्याही तोंडाला पाणी येईल एवढं नक्कीच.
फळांचा पिझ्झा बनवण्यसाठी लागणारं साहित्य :
कलिंगड, द्राक्षे, किवी, अननस, पपई, ड्रॅगन फ्रूट, काजू, चेरी, ड्रायफ्रूट्स, मध, टूटीफ्रूटी, अमूलची फ्रेश क्रीम यांचा उपयोग हा फळांचा पिझ्झा बनवण्यासाठी केला गेला आहे.
फळांचा पिझ्झा बनवण्याची कृती :
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, सगळ्यात पहिलं कलिंगड घेऊन त्याचे दोन भाग केले आहेत आणि कलिंगडाचा एक गोलाकार बेस कापून घेतला आहे. त्यानंतर पिझ्झाचे जे सहा स्लाईस असतात तसे कलिंगडाचे सहा छोटे छोटे काप करून पिझ्झाचा बेस तयार केला आणि सहा द्राक्षे टूथपिकला लावून, ती कलिंगडाच्या सहा स्लाईसच्या आतमध्ये लावण्यात आली आहेत. त्यानंतर त्यावर किवीचे सहा छोटे तुकडे कापून ठेवले आहेत. त्यानंतर अननस, पपई, ड्रॅगन फ्रूट या फळांचे छोटे छोटे तुकडे करून, ते कलिंगडाच्या बेसवर ठेवण्यात आले आहेत. अगदी शेवटी चेरी, काजू, टूटीफ्रूटी, मध, फ्रेश क्रीम हे सजावटीसाठी वरून टाकण्यात आले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला फळांचा पिझ्झा तयार झालेला व्हिडीओत दिसून येईल.
हेही वाचा :- शिल्लक चपात्यांपासून १० मिनिटांत करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट – टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन
व्हिडीओ नक्की बघा :-
हा फळांचा पिझ्झा इन्स्टाग्रामच्या (The Bearded Foodie) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो अनेकांसाठी फायदेशीर ठरेल. फळे न खाणाऱ्यांसाठी फळांचा पिझ्झा हा अगदी उत्तम उपाय ठरेल. अनेकदा चपातीचा पिझ्झा, मोनॅको बिस्कीटचा पिझ्झा बनवलेला तुम्ही व्हायरल व्हिडीओत पाहिला असेल. फळांचा हा पौष्टीक पिझ्झा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना फायदेशीर ठरेल; जे फळं खायला अगदीच कंटाळा करतात.