Viral Video : साखरपुडा, लग्न, डोहाळजेवण, बारसे आदी अनेक कार्यक्रमांत अगदी आवडीने हातावर मेंदी काढली जाते. सध्याच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार मेंदीमध्ये विविध चित्रे काढण्यात येतात. उदाहरणार्थ- जर डोहाळजेवण असेल, तर लहान मुलाचे चित्र मेंदीमध्ये रेखाटण्यात येते. त्यानंतर लग्न असेल, तर नवरा-नवरीचे चित्र, त्यांच्या लग्नाची तारीख मेंदीच्या साहाय्याने हातावर लिहिण्यात येते. जन्माष्टमी असेल, तर राधा-कृष्णाचे चित्र मेंदीमध्ये काढण्यात येते. अशा अनेक प्रकारची चित्रे वा नक्षी मेंदीमध्ये काढलेली तुम्ही आजवर पाहिले असेल. पण, तुम्ही कधी चहाप्रेमींसाठी एखादी मेंदी काढलेली पाहिली आहे का ? तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. चहाप्रेमींसाठी एक खास मेंदी एका युजरने काढली आहे; जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ एका मेंदी कलाकाराचा आहे. मेंदी कलाकार एका व्यक्तीच्या हातावर मेंदी काढत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीच्या तळहातावर वर्तुळात मेंदीने नक्षीकाम करण्यात आले आहे. त्या वर्तुळाच्या एका टोकाला मेंदीद्वारे चहाची किटली आणि किटलीच्या विरुद्ध दिशेला कपबशी काढण्यात आली आहे. किटलीतून कपात चहा ओतली जात आहे, असे चित्र हातावर काढण्यात आले आहे. चहाप्रेमींसाठी काढण्यात आलेली ही खास मेंदी एकदा तुम्हीसुद्धा बघाच …
व्हिडीओ नक्की बघा :
चहाप्रेमींसाठी खास मेंदी :
तुम्ही आतापर्यंत अनेक चहाप्रेमी बघितले असतील; जे दिवसाची सुरवात चहा पिऊनच करतात, चहासाठी शायरी, कविता लिहितात, कपबशी किंवा किटलीचे कीचेन बनवून घेतात, चहाप्रेमींसाठी खास केक बनवतात, तसेच दररोज कुल्हडचे कप चहा पिण्यासाठी वापरतात, असे आपल्यातील अनेक जण करताना दिसून येतात. पण, चहाप्रेमींसाठी काढलेली मेंदी तुम्ही आजवर पाहिली नसेल; जी या कलाकाराने काढली आहे. कपबशी आणि किटलीच्या चित्राद्वारे चहाप्रेमींचे ‘चहावरील प्रेम’ व्यक्त करणारी ही मेंदी खूपच सुंदर आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @culture mehendi art या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. उत्तम कल्पना सादर करणाऱ्या या मेंदी कलाकाराचे नाव रुची नमन बोर्डा, असे आहे. अनेक चहाप्रेमी व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त करीत आहेत. तर अनेक जण अशा पद्धतीने मेंदी काढण्याची उत्सुकता व्यक्त करताना दिसून येत आहेत. तर काही जण छान, सुंदर, खूप मस्त कल्पना आहे अशा शब्दांत मेंदी कलाकाराचे कौतुक करताना दिसून आले आहेत.