उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एका रिक्षाचालकासोबत घडलेल्या प्रकारामुळे तो अडचणीत आला असून त्याची झोप उडाली आहे. प्राप्तिकर विभागाने या रिक्षाचालकाचा तब्बल तीन कोटींच्या थकित आयकराची प्राप्तिकर नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळताच रिक्षाचालकाने पोलिसात धाव घेतली. नोटीसमधील थकबाकीची रक्कम पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. २०१८-१९ मध्ये या रिक्षाचालकाने ४३ कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय केल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.

हा अजब गजब प्रकार मथुरेत घडलाय. बकालपूर भागातील अमर कॉलनीमध्ये राहणाऱ्या या रिक्षाचालकाचं नाव प्रताप सिंग असं आहे. महामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप रिक्षाचालकाची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान, सिंग यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकून ही गोष्ट जगासमोर आणली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने असं सांगितलं की, बकालपूर येथील तेज प्रताप उपाध्याय यांच्या जन सुविधा केंद्रात त्यांनी पॅनकार्डसाठी अर्ज केला होता. कारण त्यांच्या बँकेनत त्यांना पॅनकार्ड जमा करण्यास सांगितले होते.

रिक्षाचालक प्रताप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बकालपूर येथील संजय सिंग यांच्या मोबाईल क्रमांकावरून रंगीत पॅनकार्डची प्रत मिळाली. ते शिकलेले नसल्यामुळे त्यांना मूळ पॅन आणि त्याची रंगीत प्रत यात फरक करता आला नाही. पॅनकार्ड काढण्यासाठी त्यांना तीन महिने ठिकठिकाणी फिरावे लागले. १९ ऑक्टोबर रोजी त्यांना प्राप्तिकर अधिकार्‍यांचा फोन आला आणि त्यांना ३,४७,५४,८९६ रुपये भरायचे असल्याची नोटीस देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले की कोणीतरी त्यांच्या नावावर जीएसटी क्रमांक मिळवला आणि त्याने २०१८-१९ मध्ये ४३,४४,३६,२०१ रुपयांचा व्यवसाय केला. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज कुमार यांनी सांगितले की, सिंह यांच्या तक्रारीच्या आधारे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र पोलिस या प्रकरणाची निश्चितपणे चौकशी करतील.