National Animal and Bird in One Frame Video Viral: स्वातंत्र्य दिनासारख्या खास दिवशी, भारताच्या जंगलात घडलेलं एक दृश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात स्वातंत्र्यदिनी घडलेला एक नेत्रदीपक क्षण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. निसर्गप्रेमींच्या मते हा “आयुष्यात एकदाच पाहायला मिळणारा” क्षण आहे. कारण भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर हे दोन्ही एकाच फ्रेममध्ये दिसल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, दाट जंगलातील एका मोकळ्या पायवाटेवर एक मोर हळूवार चालत आहे. त्याच्या मागे, अगदी शांतपणे आणि स्थिर पावलांनी, एक वाघ त्याचा पाठलाग करत आहे. दोघेही जणू निसर्गाच्या अद्भुत रंगमंचावर एकत्र फिरत आहेत. वाघाच्या ताकदीचं आणि मोराच्या देखणेपणाचं हे अनोखं मिश्रण, पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतं. कॉर्बेटच्या जंगलात असं दृश्य पाहणं ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ केवळ एक व्हायरल क्लिप नसून, भारतीय निसर्गसंपत्तीचा अभिमानास्पद पुरावा आहे.

हा व्हिडीओ वन्यजीव छायाचित्रकार राकेश भट्ट यांनी चित्रीत केला असून, मुख्य वन संरक्षक (IFS) डॉ. पी. एम. धकाते यांनी तो एक्स (माजी ट्विटर) वर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं. “एक अद्भुत क्षण… आपला राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी, एकाच फ्रेममध्ये! भारताच्या उत्साही आत्म्याचं प्रतीक.”

जंगलात वाघ आणि मोर एकत्र दिसणं हे जवळपास अशक्य मानलं जातं, त्यामुळेच या क्षणाचं महत्त्व अफाट आहे. युजर्सनीही या दृश्यावर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, “हा क्षण म्हणजे ताकद आणि सौंदर्याचा संगम… स्वातंत्र्यदिनी भारताच्या समृद्ध निसर्गसंपत्तीला खरी श्रद्धांजली.” तर दुसऱ्याने म्हटलं – “किती शांत, किती मोहक… पण, पुढे काय होईल याची उत्कंठा चाळवणारा क्षण.”

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आलेल्या या दुर्मीळ व्हिडीओने देशभरातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. वाघ – जो धैर्य, सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतीक आहे आणि मोर – जो शालीनता, रंगत आणि उत्साह दर्शवतो, हे दोन्ही एकत्र दिसणं म्हणजे भारताच्या आत्म्याचं जिवंत चित्र.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली – भारताची जैवविविधता ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे आणि तिचं जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जंगलातील हा क्षण केवळ सुंदर नाही, तर तो निसर्गाच्या अद्भुत संतुलनाचा आणि सहअस्तित्वाचा सर्वोत्तम नमुना आहे.