भारतीय वंशाची २५ वर्षीय तरुणी ही यंदाची ‘मिस वर्ल्ड अमेरिका’ ठरली आहे. मूळची भारतीय असलेल्या श्री सैनी हिने ‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ हा किताब मिळवला आहे. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय अमेरिकन ठरली आहे. तिला यंदाच्या वर्षीचा मिस वर्ल्ड अमेरिकेचा मानाचा मुकुट २०१७ च्या मिस वर्ल्ड डायना हेडन आणि २०१३ मिस वर्ल्ड कॅनडा यांनी त्यांच्या हाताने घातला. ‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ चा हा सोहळा लॉस एंजल्सिमध्ये आयोजित करण्यात आला होता.

श्री सैनी ही अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहते. त्यासोबतच ती एमडब्ल्यूए नॅशनल ब्युटी विथ पर्पज अॅम्बेसेडर देखील आहेत. श्री सैनी ही वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना मदत करते. विशेष म्हणजे सैनी ही १२ वर्षाची असताना एका अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. पण तरीही तिने हार मानली नाही. तिच्या प्रयत्नामुळे आज तिने हा खिताब मिळवला आहे.

‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ हा खिताब जिंकल्यानंतर श्री सैनीला तिची प्रतिक्रिया विचारली असता ती म्हणाली, “मी आता खूप आनंदी आणि चिंताग्रस्तदेखील आहे. मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही. माझ्या विजयाचे श्रेय मी माझ्या पालकांना देऊ इच्छिते. विशेषत: माझी आई जिने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. तसेच या सन्मानासाठी मी मिस वर्ल्ड अमेरिकाचे देखील आभार मानते,” असे तिने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मिस वर्ल्ड अमेरिका २०२१’ हा खिताब जिंकणारी श्री सैनीचा जन्म ६ जानेवारी १९९६ रोजी लुधियानामध्ये झाला. ती पाच वर्षांची असताना तिचे पालक अमेरिकेत स्थायिक झाले. तिने तिचे संपूर्ण शिक्षण हे अमेरिकेत घेतले आहे. श्री सैनीने यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. मिस वर्ल्ड अमेरिका २०१९ मध्येही ती सहभागी झाली होती. मात्र काही कारणामुळे तिला मध्येच ही स्पर्धा सोडावी लागली होती.