‘आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी वराडकरांचो लिओ
निवडून येऊ दे रे महाराजा!
या निवडणुकीत यश मिळांदे रे महाराजा!
कोकणची माणसं सध्या लिओ वराडकरसाठी गाऱ्हाणं घालतं आहे. हे लिओ वराडकर नक्की कोण आहेत हे एव्हाना कळलंच असेच. पहिल्यांदाच भारतीय वंशाचा त्यातूनही कोकणातला मराठी माणूस आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला आहे. तेव्हा आपला माणूस निवडून येऊ दे यासाठी सगळेच कोकणवासी प्रार्थना करत आहेत.
वाचा : पोलिसांच्या कर्माची ‘फळं’; कलिंगड चोरीमुळे सेवेतून बडतर्फी
वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केलं. २७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. आता आयर्लंडच्या राष्ट्रध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार मानले जातायत. लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. त्यांनी तिथं आयरिश नागरीक असलेल्या मरियमशी लग्न केलं. लिओ वराडकर यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं. लिओ कधी आपल्या गावी आले नसले, तरी त्याचे आई वडील मात्र अधून मधून येतच असतात. पण तरीही लिओविषयी या गावकऱ्यांना खूपच आपुलकी आहे. म्हणूनच सगळे त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. २ जूनला हे चित्र स्पष्ट होईल. तेव्हा जर वराड गावचा मुलगा आयर्लंडचा राष्ट्राध्यक्ष झाला तर सगळ्यांना किती आनंद होईल हे वेगळं सांगायला नको.