Indian Tourist Europe Tour Viral Video : अनेकांना प्रवासाची प्रचंड आवड असते. त्यामुळे ते देशातच नाही, तर परदेशांतही प्रवास करतात. त्यात परदेश प्रवास म्हणजे अनेकांचे स्वप्न असते, जे सत्यात उतरवण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात, अनेक महिने यासाठी सेव्हिंग करतात. पण कधी कधी लोकांचा परदेश प्रवासाचा अनुभव खूप चांगला अनुभव असतो, तर काही वेळा तो अत्यंत वाईट असू शकतो. सध्या असाच एका भारतीय पर्यटकाने युरोप प्रवासाचा अत्यंत वाईट अनुभव शेअर केला आहे, ज्यात त्यांनी लोकांनाही युरोपला न येण्याचं आवाहन केलं आहे. पण, युरोपमध्ये त्याच्या बाबतीत नेमकं असं काय घडलं ते आपण जाणून घेऊ…
भारतीय पर्यटकाच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. बुलबुल पांडे, असे या भारतीय पर्यटकाचे नाव आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय पर्यटक युरोपमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेबद्दल आपले प्रामाणिक मत मांडताना दिसतोय. पण, यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओत त्या भारतीय पर्यटकाने युरोपात फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना पुन्हा विचार करण्याचे आणि उन्हाळ्यात युरोपात प्रवास करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
युरोपीय शहरांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे लोकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यावर बुलबुल पांडे याने व्हिडीओ बनवीत सांगितले की, येथे खूप उकाडा आहे. जे कोणी युरोपात फिरायला येणार असतील, त्यांनी कृपया येथे येऊ नका. अनेक युरोपियन हॉटेल्स आणि अपार्टमेंटमध्ये एसी काय, साधे पंखेही नाहीत.
तसेच या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी बॉक्सएवढ्या आकाराच्या लहान रूम्स आहेत, तरीही त्याचे खूप जास्त शुल्क आकारले जातेय. अशा परिस्थितीत लहान रूम्समध्ये सामान घेऊन राहणे अवघड जात आहे. इतकेच नाही, तर युरोपियन रस्त्यांवरून फिरताना लघवीचा वास येतो. अनेक भागांत हवेत दुर्गंधी येते. तसेच एका लहान पाण्याच्या बाटलीची किंमत इथे २ ते २.५ युरो (अंदाजे २०० ते २५० रुपये) आहे, असे म्हटले आहे.
युरोपात फिरण्यासाठी येण्याच्या प्लॅनविषयी खंत व्यक्त करीत तो म्हणाला, “मला सध्या इथे येण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप होत आहे. कल्पना करा की, या कडक उन्हात एसी किंवा पंख्याशिवाय सामान घेऊन जाणे कसे असेल. त्यामुळे त्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये युरोपला भेट देण्याचा सल्ला दिला. बुलबुल म्हणाला की, मूलभूत सुविधांशिवाय युरोपच्या उष्णतेत संघर्ष करण्यापेक्षा भारतात राहून पावसाचा आनंद घेणे चांगले.
या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी तिच्या व्हिडीओला समर्थन दिले आहे; तर काहींनी विरोध केला आहे. एका युजरने इटली आणि स्वित्झर्लंडमधील अशाच अनुभवांचे वर्णन करताना लिहिले, “तू अगदी बरोबर बोलत आहेस. बहुतेक कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये पंखेही नव्हते, एसी तर सोडाच. उन्हाळ्यात युरोपात फिरायला जाणे ही चांगली कल्पना नाही. भारतातील सर्वाxत स्वस्त हॉटेलमध्येही पंखा किंवा कूलर असतो.” दुसऱ्या युजरने लिहिले की, माझी मुलगी जर्मनीमध्ये राहते. तीदेखील असेच म्हणते. तिने एक पंखा आणि एअर कूलर खरेदी केला आहे. शेवटी एकाने दावा केला की, मला माहीत नाही की तुम्ही युरोपच्या कोणत्या भागात गेला होता. अर्थात, तिथे उष्णता आहे; पण ट्रेन, ट्राम, बस आणि हॉटेलमध्ये एसी आहे. तो सुंदर देश आहे. अफवा पसरवू नका. मी गेल्या आठवड्यात तिथे गेलो होतो आणि ते आश्चर्यकारक होते.