उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

अशातच निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विजय-पराजयावर दोन विरोधी पक्षाच्या समर्थकांनी एकमेकांना अटी घातल्या असून या अटी त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिल्या आहेत. दरम्यान हा स्टॅम्प पेपर सध्या सोशल मीडीयावर तूफान व्हायरल होत आहे. हेच पेपर व्हायरल झाल्यानंतर यातील प्रकरण समोर आले आहे. मात्र व्हायरल झालेल्या प्रतिज्ञापत्राबाबत पोलिसांनी अनभिज्ञता व्यक्त केली आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेश येथील मातौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बासरी गावातील आहे. तेथील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांनी आपापसात स्टॅम्प पेपरवर अट लिहिले असल्याचे प्रकरण समोर आले आहे. अटीनुसार भाजप जिंकल्यास सपा समर्थक त्यांची दुचाकी त्यांना देईल आणि सपा जिंकल्यास भाजप समर्थकाने आपला टेम्पो पणाला लावला आहे. व्हायरल होत असलेल्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सहा साक्षीदारांची नावेही आहेत. मात्र त्याची सत्यता पाहणे हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. तर दुसरीकडे मातौंध पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह गौर यांनी सांगितले की, असे कोणतेही प्रकरण त्यांच्या निदर्शनास आलेले नाही. याची माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.