आपण साप माणसाला चावल्याचं पाहिलं आणि ऐकलं आहे. पण, उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मदाबाद येथील एका ३ वर्षीय मुलाने सापाचा चावा घेतला आहे. या घटनेत सापाचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मोहम्मदाबाद जिल्ह्यातील मदनापूर भागात राहत असलेला तीन वर्षीय आयुष आपल्या अंगणात खेळात होता. तेव्हा, त्याच्या आजीने पाहिलं की आयुष सापच्या पिल्लाला तोंडात धरून चावत होता. हे पाहिल्यावर आजीने तातडीने आयुषच्या तोंडातून साप काढून टाकला. त्यांनी तोंड पाण्याने स्वच्छ करत आयुषच्या आई-वडिलांना ही माहिती दिली.




मुलाने साप तोंडात धरून चावल्याने पालकांना काळजी वाटू लागली. त्यामुळे वडिल दिनेश कुमार यांनी आयुषला डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात जाताना सापही प्लॅस्टिकच्या पिशवीत बरोबर नेला होता.
डॉक्टरांनी आयुषला काही वेळ निरीक्षणाखाली ठेवत औषध दिली. त्यानंतर आयुषला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. “साप बिनविषारी प्रजातीचा होता,” असं डॉक्टरांनी सांगितलं.