Kid’s Lord Vitthal Costume Wins Devotees’ Hearts :देव माझा विठू सावळा…अशा शब्दात पंढरपूरच्या पांडुरंगाचे वर्णन केले जाते.कित्येक युगांपासून चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर येथे पांडुरंग विठ्ठल विटेवर उभा आहे असे म्हटले जाते. दरवर्षी या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रातील सर्व कोपर्यांमधून वारकरी मोठ्या भक्तीने पंढरपूरात येतात. नुकताच महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीचा सोहळा उत्साहात पार पडला.
महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातून विठ्ठलाचे भक्त वारीमध्ये सहभागी होतात. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”, “माऊली माऊली…” असा हरी नामाचा जयघोष करतात. सर्वत्र उत्साह अन् चैतन्याचे वातावरण असते प्रत्येक गावात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि वारकर्यांचे उत्साहात स्वागत करतात. अशा वेळी अनेकदा लहान मुलं पांडुरंग-रुक्मिणी, तुकोबा, ज्ञानोबा किंवा वारकर्याच्या वेषभूषा परिधान करतात. चिमुकल्यांना अशा रुपात पाहून अनेकांना साक्षात विठ्ठल रखुमाई अवतरल्याचा भास होतो. असाच काहीशा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘देव माझा विठू सावळा!’, चिमुकल्याला पाहून भक्तांना झाला विठ्ठरायाचा भास,
व्हिडीओमध्ये, चिमुकल्याने सावळ्या विठ्ठलाची वेषभूषा परिधान केली आहे. त्याने चेहऱ्याला, हाताला सर्वत्र काळा रंग लावला आहे. त्याने सोनरी रंगाची किनार असलेले काळ्या रंगाचे धोतर, उपरनं परिधान केल्याचे दिसते. त्याच्या कानात माशाच्या आकाराची कर्णफुले आहेत. गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. दोन्ही हाताला बाजूबंद आहे.गळ्यात कंठी (मोत्याची किंवा सोन्याची माळ) घातली आहे. चिमुकल्याने विठ्ठलाच्या मुर्तीप्रमाणे पोशाख परिधान केला आहे. त्यामुळे त्याला पाहता क्षणी साक्षात विठ्ठल समोर आहे असा भास प्रत्येकाला होत आहे. येणारे -जाणारे सर्वजण त्याच्याकडे कौतुकाने पाहात आहे.
mumbai_ganesh_utsav_ and 2 others नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, “देव माझा विठ्ठ सावळा”, असे कॅप्शन दिले आहे.व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी चिमुकल्याचे कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली की, “काही क्षणासाठी विठ्ठल आहे याचा खूपच भास झाला.”
दुसर्याने लिहिले की, “पाहणाऱ्याला तर दगडात पण पंढरी दिसला आहे रे, हा तर साक्षात बसला आहे.”
तिसऱ्याने कमेंट केली की, “मला वाटलं मूर्तीचं ठेवली आहे.”
चौथ्याने लिहिले की, “खरंच देवासारखा शांत बसला आहेत.”
पाचव्याने लिहिले की, “त्या विठूची नजर जणू काही बोलतेय की माझं लक्ष आहे तुझ्यावर”