टॅक्सी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेली ‘लखनऊ गर्ल’ प्रियदर्शिनी नारायण यादव पुन्हा चर्चेत आली आहे. या टॅक्सी चालकाला २२ वेळा कानाखाली लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर बरीच टीका झाली. तिला अटक करण्याची मागणीही सोशल मीडियावर होत होती. मात्र असं असतानाच आता प्रियदर्शिनीने पुन्हा एकदा या टॅक्सी चालकाला धमकावलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पोलिसांबद्दलही भाष्य केलं आहे. पोलिसांनी व्यवस्थित स्वत:चं काम केलं असतं तर आज त्या चालकाला कानाखाली खाव्या लागल्या नसत्या, असं प्रियदर्शिनी म्हणाली आहे.

एका मुलाखतीदरम्यान प्रियदर्शिनीने पोलिसांवरच गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं नाही. त्यामुळेच मला कायदा हातात घ्यावा लागला, असा दावा प्रियदर्शिनीने केलाय. तसेच आता हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रियदर्शिनीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र प्रकरण मिटवण्यासाठीही तिने या टॅक्सी चालकाला धमकावले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिने सादत अली सिद्दीकी म्हणजेच टॅक्सी चालकाला पॅचअप किंवा पोलखोल असे दोन पर्याय देत धमकावले आहे. “सादत अली सिद्दीकीने पॅचअप करावं नाहीतर मी त्याची पोलखोल करेन. या पोलखोलमध्ये मी घरुन निघाल्यापासून हे प्रकरण घडेपर्यंत काय काय घडलं याचे सगळे सीसीटीव्ही फुटेज काढेत. यामध्ये हॉटेल, मेट्रो, पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीचा समावेश असेल,” असं प्रियदर्शिनीने म्हटलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

काही आठवड्यांपूर्वी लखनऊमधील कृष्णानगर भागातील एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये प्रियदर्शनीने टॅक्सी चालकाला भरचौकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २२ वेळा कानाखाली लगावली. एवढचं नाही तर तिने या चालकाचा फोनही रस्त्यावर आपटून फोडला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर #ArrestLucknowGirl या नावाने ट्विटरवर हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रियदर्शनीविरोधात मारहाण आणि लूट केल्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र आता प्रियदर्शिनीला हे प्रकरण पोलीस स्थानकाबाहेरच सोडवण्याची इच्छा आहे. तरीही तिने ही इच्छा सुद्धा धमकी देतच बोलून दाखवलीय.

कोण आहे ही ‘लखनऊ गर्ल’?

प्रियदर्शनी नारायण यादव असं आहे. प्रियदर्शनीने बीएससी, एमएससी आणि एम.फिलमध्ये डिग्री मिळवली असून तिला संशोधनाचाही अनुभव आहे. प्रियदर्शनीने दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये काम केलं आहे. पण सध्या ती लखनऊमध्ये रहायला असते. प्रियदर्शनीने सुरूवातीला लखनऊ विश्वविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केलं. तिच्या आईचं नाव शशिकला प्रसाद असून त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तिचे वडील रेल्वे कर्मचारी होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. प्रियदर्शनी पार्ट टाइम मॉडेम म्हणून काम करते. सोबतच ती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असून ‘पम्पकिन क्लासेस’ असं तिच्या क्सासेसचं नाव आहे.