अनेकदा रिक्षाने प्रवास करताना चालकाने सांगितलेलं भाडं ऐकून प्रवासी त्यांच्याबरोबर वाद घालताना दिसतात. पण, या रिक्षावरच चालकासह त्याच्या कुटुंबाचे पोट अवलंबून आहे, याचा अनेकांना विसर पडलेला असतो. अनेक प्रवासी एक दोन रुपयांसाठीही रिक्षाचालकाशी वाद घालताना दिसतात. अशाच एका रिक्षाचालकासह वाद घालणाऱ्या महिलेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सुरुवातीला भांडणाऱ्या महिलेने आपल्या ठिकाणी पोहचताच रिक्षाचालकासाठी असे काही केले, जे पाहून तुमचेही ह्रदय भरून येईल.

एका महिलेने लखनऊच्या हजरतगंज मेट्रो स्टेशनवर एका रिक्षाचालकाला थांबवले, मग ती त्याला भाडं विचारू लागली. यावेळी चालकाने सांगितलेलं भाडं जास्त वाटल्याने महिलेने ते कमी करण्यावरून चालकाशी वाद घातला. यावर रिक्षाचालक तुम्हाला योग्य वाटेल तेवढं भाडं द्या असं म्हणाला. हे ऐकताच महिला लगेच रिक्षात बसली. यावेळी रिक्षाचालक दिव्यांग असल्याचे तिला दिसले, ज्यानंतर तिला आपण रिक्षाचालकाला भाडं कमी करण्यावरून बोललेल्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. या घटनेबाबत महिलेने स्वत: सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच ट्विटरवर या चालकाचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

महिलेने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक अपंग रिक्षाचालक दिसत आहे. या व्हिडीओवर युजर्सकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कारण या हृदयस्पर्शी गोष्टीतून एक मोठी शिकवण देण्यात आली आहे.

बहुतेक लोक भाजी विक्रेते, रिक्षाचालक किंवा छोट्या व्यावसायिकांकडून कोणतीही वस्तू खरेदी करताना दहा, पाच रुपयांसाठीही घासाघीस करतात. अशावेळी काही ग्राहक विक्रेत्यांशी किंवा चालकांशी अतिशय उद्धटपणे बोलतात. पण, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कष्ट करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोल द्यायला हवेत, हे फार कमी लोकांना कळते.

अशाप्रकारे लखनऊमधील या महिलेलाही आपली चूक लक्षात येताच, तिने रिक्षाचालकाला त्याच्या वैयक्तिक संघर्षाबद्दल विचारणा केली. याविषयी महिलेने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, जेव्हा मी त्याला त्याच्या तुटलेल्या हाताबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्याने स्वत:ची ओळख करून देत म्हणाला, माझे नाव मोहन असून १९९३ मध्ये गिरणीत काम करत असताना एक अपघात झाला, ज्यात त्याचा हात कापला गेला. हे ऐकून महिलेने विचारले की, तेव्हापासून तुम्ही एका हाताने काम करत आहात का? तो म्हणाला- मी एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो. तो आपल्या दोन मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी हे काम करतो. यावर महिलेने त्याला प्रोत्साहन देत म्हटले की, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. यानंतर महिला भाडे देऊन रिक्षातून खाली उतरली आणि काही जास्तीचे पैसे आणि खाण्याचे पदार्थ देऊन निघून गेली. यातून कोणत्याही आव्हानावर कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्तीने मात करता येते, अशी शिकवण दिली आहे.

हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ @dreamer_nj0605 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर आणि त्यामागची स्टोरी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण, जगभर असे अनेक लोक आहेत जे अशाप्रकारे कठीण परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलेय की, जगाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिलेय की, चांगल्याप्रकारे एक मेसेज दिल्याबद्दल धन्यवाद. पण, या पोस्टवर तुमचे काय मत आहे; आम्हाला कमेंट करून कळवा.