Taj Mahal Style House Viral Video : पत्नीच्या इच्छेखातर किंवा प्रेमापोटी पतीने काहीतरी अजब गोष्टी केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृतीप्रित्यर्थ ताजमहाल बांधला. पांढऱ्या संगमरवरापासून बांधलेला हा ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. हा ताजमहाल बाहेरून जितका सुंदर आहे, तितकाच आतूनही सुंदर आहे. अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी खास अगदी ताजमहालसारखे हुबेहूब दिसणारं आलिशान घर बांधलं आहे.

4BHK घर खऱ्या ताजमहालइतकेच सुंदर

हे घर बाहेरून अगदी ताजमहालसारखे दिसते. पांढऱ्या मकराना संगमरवरापासून बांधलेले हे 4BHK घर खऱ्या ताजमहालइतकेच सुंदर दिसते. अनेक जोडप्यांचं स्वप्न असते की, त्यांचेही घर ताजमहालसारखेच आलिशान आणि भव्य असावे. मध्य प्रदेशातील आनंद प्रकाश चौकसे यांचे आणि त्यांच्या पत्नीचे असेच स्वप्न होते आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात राहणाऱ्या या जोडप्याने ताजमहालसारखेच दिसणारे एक भव्य 4BHK घर बांधले आहे. हे घर इतके सुंदर आहे की, पहिल्या नजरेत तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. पाहताना वाटेल की, आपण खराखुरा ताजमहाल तर पाहत नाही ना. या आलिशान घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे घर आनंद प्रकाश चौकसे आणि त्यांच्या पत्नीचे आहे. पण, हे घर खऱ्या ताजमहालपेक्षा आकाराने एक तृतीयांश लहान आहे, परंतु तितकेच सुंदर आणि भव्य आहे.

कंटेंट क्रिएटर @priyamsaraswat ने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो जोडप्याला विचारतो की, हे खरोखर त्यांचे घर आहे की ताजमहालची कॉपी आहे? यावर जोडपं हसून ‘हो’ म्हणते आणि नंतर घराची एक छोटीशी टूर करतात.

घरात सुंदर संगमरवरी घुमट, कोरीव खांब आणि कमानीदार दरवाजे आहेत. हे आलिशान घर एका शाळेच्या आवारात बांधले आहे, ज्याची सुरुवात आनंद प्रकाश चौकसे यांनी स्वतः केली होती. व्हिडीओमध्ये स्पष्ट केले आहे की, जसा खरा ताजमहाल प्रेमाचा प्रतीक म्हणून बांधला गेला. त्याचप्रमाणे त्यांचे हे ताजमहालासारखे हुबेहूब दिसणारे घरंही त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिशान घर बांधणाऱ्या जोडप्याचे युजर्सनी केले कौतुक

ताजमहालाप्रमाणे दिसणाऱ्या या आलिशान घराच्या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी खूप पसंती दिली. अनेकांनी हे आलिशान घर बांधणाऱ्या जोडप्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. यावर एका युजरने कमेंट करत म्हटले की, ‘मला घरापेक्षा हे गोंडस जोडपे जास्त आवडले.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मध्य प्रदेशचा ताजमहाल.’ तर शेवटी एकाने म्हटले की, ‘ही कबर नाही, तर ताजमहालसारखे घर आहे.’