आइसक्रिम म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तरुण मंडळी आइसक्रिम खाणं सर्वाधिक पसंत करतात. मात्र गेल्या काही दिवसात पदार्थांची विशिष्ट सांगड घालून नव्या डिश समोर आणल्या जात आहेत. चौमेन पाणीपुरी, फँटा मॅगी, रुहअफजा चहा अशा एक ना अनेक डिश समोर आल्या आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीसोबत वेगवेगळे प्रयोग केले जात असताना आता ‘मॅगी आइसक्रिम रोल’ची चर्चा रंगली आहे. या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओत सर्वप्रथम शिजलेली मॅगी घेतली जाते. आइसक्रिम रोल बनवण्याच्या थंड पॅनवर ठेवली जाते. त्यानंतर त्यावर क्रिम टाकलं जातं. मॅगी आणि क्रिमचं मिश्रण केलं जातं. मॅगी आणि क्रिम एकजीव झाल्यानंतर त्याचे रोल केले जातात आणि प्लेटमध्ये ठेवतात. आइसक्रिम सजवण्यासाठी त्यावर चॉकलेट सिरप आणि किशमिश टाकलं जातं.
व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘मॅगीच्या शक्तींचा चुकीचा उपयोग केला जात आहे’ असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर काही जणांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ‘हा व्हिडीओ पाहून मला भीती वाटते आहे’. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.’