महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर राम सातपुते यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे. राम यांचे आई-वडील ऊसतोडी करत होते. भाजपानेही एका उसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिला. जनतेनेही या निर्णयाला मतपेटीतून कौल देत सातपुते यांना निवडून आणले. आता सातपुते यांच्या राहत्या घराचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सातपुते यांच्या विजयानंतर त्यांच्या राहत्या घराचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सातपुते यांच्या उंचीहून कमी उंचीचे गावातील एक पत्रे टाकलेले, मातीने सारवलेल्या भिंती असणारे घर दिसत आहे. या घराच्या दारासमोरच सातपुते उभे असल्याचे फोटोत दिसतेय.  माळशिरसमधील पुरंदावडे येथील भांबुर्डी गावातील चाहुरवस्तीमध्ये हे घर आहे. हे घरही सातपुते यांच्या मालकिचे नसून त्यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्या मालकीचे आहे. सातपुते यांनी उमेदवारी अर्जबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:च्या नावावर घर नसल्याचे म्हटले आहे. सातपुते यांची एकूण जंगम मालमत्ता ५ लाख २५ हजार ७६० रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच आपल्यावर ७५ हजाराचे कर्ज असून आपल्या नावावर शेतजमीन अथवा कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राम सातपुते

सातपुतेंचा खडतर प्रवास –

राम सातपुते यांची घरची परिस्थिती बेताची होती. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे १९९० ते १९९५ पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम सातपुते यांनी पुणे गाठले. त्यावेळीच त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. राम सातपुते यांना मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाते.