Mamata Banerjee Viral Photo Is Fake: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी गंभीर दुखापतग्रस्त झाल्या होत्या. यात त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम झाली होती. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ममता बॅनर्जी यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण, दुखापतग्रस्त झाल्यानंतरचे त्यांचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले. यातील अनेक फोटोंत ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम झाल्याचे दिसत होते, पण यात असा एक फोटो व्हायरल होत होता, ज्यात ममता बॅनर्जींच्या कपाळाच्या डाव्या बाजूला बँडएड लावलेली दिसत होती. याच फोटोंवरून आता ममता बॅनर्जींच्या कपाळावर झालेली ‘ती’ जखम खोटी असल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता लाइटहाऊस जर्नालिझमने तपासादरम्यान ममता बॅनर्जींच्या कपाळावरील जखमेसंबंधित त्या दोन वेगवेगळ्या फोटोंमागची एक खरी बाजू समोर आणली आहे. ही खरी बाजू नेमकी काय आहे पाहूयात.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @naturalphoton ने ममता बॅनर्जी यांचे दोन व्हायरल फोटो आपल्या अकाउंटवरून शेअर केलेत.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे पाहा.

https://archive.ph/0trW2

इतर युजर्सदेखील हे फोटो वापरून तोच दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही दोन्ही फोटोंच्या रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. आधी आम्ही कपाळावरील जखम दिसत असलेले फोटो शेअर केले.

आम्हाला अनेक माध्यम संस्थांच्या वेबसाइटवरदेखील हे आणि असेच फोटो सापडले.

https://www.ndtv.com/india-news/mamata-banerjee-suffered-major-injury-says-trinamool-congress-5238911

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १४ मार्च रोजी घरी पडल्या, ज्यामुळे त्यांच्या कपाळाला दुखापत झाली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर तीन टाके पडले. दरम्यान, उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर आम्ही दुसऱ्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च वापरले. या दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या कपाळावर डाव्या बाजूला बँडएड दिसते.

इंडिया टुडेच्या वेबसाइटवरील लेखात आम्हाला असाच एक फोटो आढळला, जो लेख २४ जानेवारी २०२४ रोजी अपडेट केला गेला होता.

https://www.indiatoday.in/india/story/mamata-banerjee-suffers-minor-head-injury-as-car-meets-with-accident-on-way-on-kolkata-2493024-2024-01-24

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल पोस्टमधील ममता बॅनर्जींचा बँडएडचा फोटो जानेवारी महिन्यातील आहे.

रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी २४ जानेवारी रोजी वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना एका किरकोळ कार अपघातात जखमी झाल्या. यावेळी त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला लागल्याने त्यांनी ती बँडएड लावली होती.

व्हायरल इमेजवर ABP Live चा लोगो होता. फोटोच्या उजव्या बाजूला रिॲक्ट ऑप्शन होता, त्यामुळे हा स्क्रीनशॉट एखाद्या रीलमधून घेतला असावा असा आम्हाला संशय आहे.

त्यानंतर पुन्हा रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला, एबीपी आनंदच्या फेसबुक पेजवर आम्हाला एक रील सापडली.

एबीपी आनंदच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अपघातानंतर ममता बॅनर्जी माध्यमांशी संवाद साधताना दिसल्या, ती रीलदेखील आम्हाला आढळली.

हा व्हिडीओ सात आठवड्यांआधी अपलोड करण्यात आला होता.

यावरून सिद्ध होते की, ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला बँडएड लावलेला फोटो सध्याचा नाही, ज्यामुळे भ्रामक दाव्यासह तीन महिन्यापूर्वीचा फोटो शेअर केला जात आहे.

निष्कर्ष : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कपाळावरील जखमेसंबंधित दोन फोटो शेअर केले जात आहेत. यातील एका फोटोत त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम झाल्याचे दिसतेय, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला बँडएड लावलेली दिसतेय. ज्यावरून अनेकांनी त्यांच्या डोक्याला झालेल्या दुखापतीची जागा बदलली कशी, असा प्रश्न उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला बँडएड लावलेला फोटो सध्याचा नाही. तो तीन महिन्यांपूर्वीचा आहे, त्यामुळे फोटोबरोबर केलेला दावाही खोटा आहे.