MP Man Beaten Naked: मध्यप्रदेशात एका आदिवासी मजुरांवर लघवी केल्याचे प्रकरण अद्यापही ताजं असताना आता एका नवा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुन्हा मध्य प्रदेशातील एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एका तरुणाला नग्न करून काठीने मारले जात आहे. व्हिडिओमध्ये सदर तरुण हा हात जोडून मला जाऊद्या नाहीतर मारून टाका अशी विनंती करताना दिसत आहे. मारहाण करताना अंतर्वस्त्र सुद्धा घालू न देता त्याला प्लॅस्टिकच्या मोठ्या बांबूसारख्या दांड्याने फटके मारले जात आहेत.
व्हिडिओमधील तरुण हे प्रकरण जुन्या एका चोरीच्या घटनेशी संबंधित आहे असे म्हणताना दिसत आहेत. पुन्हा अशी चूक करणार नाही अशी शपथ घे असेही काहीजण मागून बोलताना दिसत आहेत. सदर व्हिडीओ हा मोतीनगर क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओ संदर्भात एसपी विक्रम सिंह कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मात्र त्यातून या व्यक्तींची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवलेली असून पोलीस सध्या आरोपींना शोधण्यासाठी अलर्टवर आहेत.
अलीकडेच मध्यप्रदेशमधून अशाच गुन्ह्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. सिधी येथील एका आदिवासी मजुरावर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता. या व्यक्तीच्या वडिलांकडून हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला गेला होता, माझा मुलगा भाजपा आमदारांचा प्रतिनिधी आहे व तो असे करूच शकत नाही असेही आरोपीच्या वडिलांनी म्हटले होते. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हिडिओची दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली होती तसेच त्याच्या काही अनधिकृत बांधकामांवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती.