First Salary Investment: आयुष्यात घडणारी प्रत्येक पहिली गोष्ट कायम प्रत्येकाच्या लक्षात राहते. तसाच पहिला पगारही प्रत्येकासाठी अविस्मरणीय क्षण असतो आणि जो आयुष्यभर लक्षात राहतो. या पगारावर आपण कुटुंबाची किंवा आपली काही स्वप्न रंगवलेली असतात. अनेकदा कष्टाने कमावलेले हे पैसे कसे खर्च करायचे किंवा कसे वाचवता येईल असे अनेक विचार येतात. यात सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पहिल्या पगारात आईला साडी घेणे, वडिलांसाठी काहीतरी घेण्याचा विचार करते. पण एका तरुणाने थोडा पुढचा विचार करुन कुटुंबासाठीच घरात एक महागडी वस्तू घेण्याचा निर्णय घेतला. तरुणाच्या या निर्णयाने आता अनेकांची मनं जिंकली.
देवेश कुमार असे या तरुणाचे नाव आहे, ज्याने नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण केले, ज्यानंतर त्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून इंटर्नशिप केली. या इंटर्नशिपसाठी मिळालेल्या पगारातून त्याने आपल्या आई- वडिलांसाठी एक एसी खरेदी केला आहे. देवेश कुमार याने ट्विटरवर एक भलामोठा पॅकिंग बॉक्सचा फोटो शेअर केला आहे, ज्यात एयर कंडीशन आहे. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी पहिल्या इंटर्नशिप सॅलरीतून कुटुंबासाठी एसी खरेदी केला आहे. तरुणाच्या या ट्विटवर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. युजर्सनी तरुणाचे अभिनंदन करत आपला पहिला पगार कुठे आणि कसा वापरा होता याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. अनेकांना देवेशचा हा निर्णय खूप आवडला आहे.
एका ट्विटर युजरने कमेंट करत लिहिले की, खूप छान, हे काहीतरी अनोखे गिफ्ट आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, कुटुंबासाठी पहिला एसी खरेदी करणे हा मध्यमवर्गीय तरुणासाठी सर्वात अभिमानाचा क्षण आहे. मी त्याचा भावना समजू शकतो. अशाचप्रकारे चांगले काम करत राहा. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, मी तुला ओळखत नाही, पण माझ्या मित्रा, मला तुझा अभिमान आहे.
ही पोस्ट @theywayshhh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून २४ जुलै रोजी ट्विट करण्यात आली आहे. जी आत्तापर्यंत ८.४ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि ज्याला २० हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.