Mobile Phone Lost In Rain Video Viral : सध्या जयपूरमधील मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील असा एक व्हिडीओ, जो पाहून लोक भावूक होत आहेत. कारण व्हिडीओतील तरुणाला लोक स्वत:बरोबर रिलेट करत आहे. मोबाईल ही प्रत्येकसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण मोबाईलला जीवापेक्षा जास्त जपतात. यात स्वत:च्या आवडीचा मोबाईल घेण्यासाठी काही लोक एक एक रुपया साठवून ठेवतात. पण, विचार करा पै नं पै साठवून घेतलेला मोबाईल आपल्या डोळ्यांदेखत अचानक पावसाच्या पाण्यात पडला आणि सापडलाच नाही तर? हे वाचून तुम्हीही विचारात पडाल, पण प्रत्यक्षात या तरुणाच्या बाबतीत तसं घडलं आहे, ज्यामुळे तो भररस्त्यात बसून ढसाढसा रडू लागला. यावेळी कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर खूप पाणी साचलयं. या घाणेरड्या पाण्यात एका तरुणाचा मोबाईल पडल्याने तो शोधताना दिसतोय. बराच वेळ तो त्या घाण पाण्यात हात घालून अक्षरश: त्या पाण्यात बसून मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, पण काहीच हाती लागत नाही. आजूबाजूने अनेक गाड्या जातायत, ज्याचा चिखल अंगावर उडतोय, पण कशाचीही चिंता न करता तो तरुण मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत राहतो.
पण, शेवटी काहीच हाती न लागल्याने तो रस्त्याच्या कडेला बसून ढसाढसा रडू लागतो. यावेळी रागात तो सिस्टमला शिव्या देऊ लागतो. यावेळी तो रागात म्हणतोय की, ही सर्व सिस्टमची चूक आहे, योग्य ड्रेनेज आणि पाण्याचा निचरा होत नाही म्हणूनच आज माझा फोन हरवला.
दरम्यान, तरुणाचा हा भावूक करणारा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक आता विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली की, मला त्याचा पत्ता सांगा, मी मोबाईल भेट देईन. दुसऱ्याने लिहिले की, बिचाऱ्याने खूप मेहनत घेऊन मोबाईल विकत घेतला होता. तिसऱ्याने लिहिले की, हे पाहून मला वाईट वाटत आहे. दरम्यान, अनेक जण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचा दावा करत आहेत.