Dangerous Stunt On Bike Video: रस्त्यावरून वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे फार महत्त्वाचे असते, अन्यथा कधी कोणती घटना घडेल सांगता येत नाही. पण, काही वेळा नियमानुसार गाडी चालवतानाही दुसऱ्याच्या चुकीचा फटका तुम्हाला सहन करावा लागतो. यात काही बाईकस्वार रस्ता आपल्याच मालकीचा असल्याप्रमाणे गाडी चालवताना दिसतात. यावेळी ना कोणाची भीती, ना कुणाची पर्वा करत हे बाईकस्वार बेधडकपणे बाईक चालवतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाईकस्वार सरदारजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओत सरदारजी ज्या पद्धतीने बाईक चालवतोय, ती पद्धत पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओतील सरदारजीचे ड्रायव्हिंग स्कील पाहण्यासारखे असले तरी ते इतरांसाठी मात्र तितकेच धोकादायक आहे.
सरदारजींची बाईक चालवण्याची पद्धत पाहून तुम्हीही व्हाल शॉक
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कारमधून कुठे तरी जात आहे. यावेळी रस्त्यात त्याला असा एक हेवी बाईक रायडर दिसतो, ज्याचे ड्रायव्हिंग स्कील पाहून तोही शॉक होतो आणि तो त्याचा व्हिडीओ शूट करतो. त्याने शूट केलेल्या व्हिडीओत एक बाईक रस्त्यावरून धावताना दिसतेय. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाईकवरील व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर नाही तर चक्क मागच्या सीटवर पायावर पाय ठेवून आरामात बसली आहे. खुर्चीत कसे आरामात बसतो त्याचप्रकारे तो बसलाय. इतकेच नाही तर तो हँडलवरील हात सोडून बाईक चालवतोय. धक्कादायक म्हणजे चालत्या बाईकवर बसून फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. अशाप्रकारे बाईक चालवून तो स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतोय.
@ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आता अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, हे फक्त भारतातच होऊ शकते. आणखी एका युजरने लिहिले- घोस्ट रायडर. अशाप्रकारे अनेक युजर्स बाईकस्वाराचे ड्रायव्हिंग स्कील पाहून संताप व्यक्त करतायत, तर काहींनी त्याचे कौतुक केले आहे.