WhatsApp Chats Viral SS: एखाद्याचा नंबर शोधणे हे सोशल मीडियाच्या काळात अगदी सोपे झाले आहे. पण नैतिकतेच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्तीशी अशा गैरप्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे. याचाच विसर पडलेल्या एका एअरलाइन कॉन्ट्रॅक्टरने अलीकडे विमानात पाहिलेल्या एका तरुणीशी संपर्क साधण्यासाठी शोधून काढला. त्याने चक्क विमानाच्या तिकीट बुकिंगच्या वेळी तिने नोंदवलेला नंबर शोधून तिला थेट WhatsApp वर मेसेज पाठवला होता. २२ वर्षीय तरुणीने विचारणा केली असता त्याने एअरलाइन डेटाबेसद्वारे नंबर शोधल्याची कबुलीही दिली. त्याच्या WhatsApp चॅट्सचे स्क्रिनशॉट्स सध्या व्हायरल होत आहेत, जे पाहून नेटकऱ्यांनी एअरलाईनच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
प्राप्त माहितीनुसार हॅना स्मेथर्स्ट, मँचेस्टर येथील ग्रीनविच विद्यापीठाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून अबू धाबीमधील तिच्या ब्रेकनंतर एतिहाद एअरवेजच्या फ्लाइटने घरी जात होती. २२ वर्षीय तरुणी विमानतळावर पासपोर्ट चेकिंगसाठी उभी असताना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला त्यात समोरच्या व्यक्तीने मी तुला अबू धाबीहून पाहिले आहे असे म्हटले, नंबर कसा मिळाला हे विचारले असता त्याने आधी सॉरी म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने पुन्हा विचारणा करताच त्याने मी तुझा नंबर सिस्टीममधून शोधला असे उत्तर दिले.
यावर तरुणीने कोणती सिस्टीम विचारले असता त्याने “एअरलाइन, त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. मी तुम्हाला त्रास देत असल्यास. फक्त मला ब्लॉक करा. FYI तुमची फ्लाइट बोर्डिंग करत आहे.” असेही उत्तर दिले.
तरुणीने सदर प्रकार शेअर करत म्हटले की “एतिहाद एअरवेजसाठी काम करणार्या एका व्यक्तीने माझा वैयक्तिक डेटा वापरला. माझा फोन नंबर मिळवण्यासाठी माझा पासपोर्ट पाहिल्यानंतर एअरलाइन डेटाबेसद्वारे त्याने नंबर शोधला. एकटीने प्रवास करण्याचा भयानक अनुभव.”

दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना एका निवेदनात, इतिहाद एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, “गैरपद्धतीने तरुणीला संपर्क करणारी व्यक्ती तृतीय-पक्ष कंत्राटदार आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. आमच्या प्रवाशांची गोपनीयता आणि सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे आणि आमच्या अतिथींना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.”