Man Quits Rs 3 And Half Crore Salary Job At Netflix: नेटफ्लिक्स या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनियरने नोकरीचा राजीनामा दिलाय. आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आहे? तर या व्यक्तीचा वर्षिक पगार हा साडेतीन कोटी रुपये होता. पण नोकरीचा कंटाळा आल्याने त्याने ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलीय. लिंक्डइनवरुन या तरुणानेच नोकरी सोडण्याचा निर्णय कसा आणि का घेतला यासंदर्भात आणि त्यानंतर काय घडलं याबद्दल माहिती दिलीय.

मायकल लीन असं या व्यक्तीचं नाव असून तो नेटफ्लिक्समध्ये सन २०१७ मध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला लागला होता. यापूर्वी तो अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग कंपनीसाठी काम करायचा. “नोकरीला सुरुवात केली तेव्हा मी आता यापुढे कायम नेटफ्लिक्ससोबत राहील असं वाटलं होतं. मी वर्षाकाठी ४ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार साडेतीन कोटी रुपये) कमवायचो. मला रोज मोफत जेवण, वाटेल तेवढ्या पेड लिव्ह मिळायच्या. एखाद्या मोठ्या टेक्नलॉजीशी संबंधित कंपनीमधील हा ड्रीम जॉब होता,” असं लीन लिंक्डइनवरील पोस्टमध्ये म्हणतो. त्यामुळेच त्याने मे २०२१ मध्ये जेव्हा कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी लीनला वेड्यात काढलं.

“सर्वात आधी माझ्या पालकांनी विरोध केला. त्यांच्यासाठी मी ही नोकरी सोडणं म्हणजे त्यांनी अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं होतं. माला मार्गदर्शक करणारी व्यक्ती ही मला विरोध करणारी दुसरी व्यक्ती ठरली. दुसरी नोकरी हातात असल्याशिवाय नोकरी सोडू नको असा त्यांचा सल्ला होता. कारण हातातील एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून पुढील नोकरी मिळवताना पगारासंदर्भातील तडजोड करताना फार त्रास होईल, असं त्यांचं मत होतं,” असंही लीनने पोस्टमध्ये सांगितलंय.

या सर्व गोष्टींमुळे लीनने पुन्हा विचार केला. मॅनेजरकडे नोकरी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्याआधी त्याने तीन दिवस विचार केला. नोकरी सोडण्यासंदर्भात बोलताना लीनने आपण मागील काही वर्षांमध्ये नोकरीसंदर्भात फार साऱ्या गोष्टी शिकल्याचं सांगितलं. “नेटफ्लिक्समध्ये काम करणं म्हणजे एमबीएच्या अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या एखाद्या केस स्टडीसाठी पैसे मिळावेत असा प्रकार आहे. ते प्रत्येक प्रोडक्टसंदर्भातील मेमोज तयार करुन ते प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहचतील याची काळजी घेतात. त्यामुळे मी रोज काहीतरी नवं शिकत होतो,” असं लीन म्हणतो.

मात्र करोनामुळे लीनच्या कंपनीबद्दलच्या सर्व संकल्पना बदलल्या. म्हणजेच लोकांसोबत काम करणं, ऑफिसमधील जोडीदार, चांगल्या कामासाठी मिळणारे अधिकचे पैसे यासाऱ्या गोष्टी अचानक संपुष्टात आल्या. “केवळ कामच शिल्लक राहिलं. त्यामुळे मला माझ्या कामातून आनंद मिळत नव्हता,” असं लीन सांगतो. “

“मला मोठा परिणाम करणारी नोकरी करण्याची इच्छा होती. माझ्यासाठी इंजिनियरिंग रिसोर्सेस हे इंजिनियरिंगच्या कामापेक्षा अधिक महत्वाचे होते. यासाठीच मला प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करण्याची इच्छा होती,” असं लीन म्हणतो. त्यामुळेच लीनने नेटफ्लिक्समध्ये दोन वर्ष काम पूर्ण झाल्यानंतर प्रोडक्ट मॅनेजर पोस्टसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. मात्र नेटफ्लिक्समध्ये कंपनीअंतर्गत विभाग बदलून देण्याची यंत्रणाच नसल्याने लीनला या अर्ज करण्याच्या कसरतीचा फार फायदा झाला नाही. “कंपनीमध्ये एखाद्या इंजिनियरला प्रोडक्ट मॅनेजमेंटच्या जागी नियुक्त करण्यात आल्याचं मी कधीच पाहिलं नाही. त्यामुळेच आता प्रोडक्ट मॅनेजर म्हणून संधी मिळण्याची शक्यताच उरली नाही. त्यामुळे माझा पगार हा मला अयोग्य वाटू लागला. मी जेव्हा नेटफ्लिकेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मला पगार चांगला होता आणि महत्वाचं म्हणजे मला नवीन गोष्टी शिकता येत होत्या. मात्र आता मला फक्त पगार मिळतोय, करियरमध्ये काही विशेष वाढच नाहीय,” असं लीन म्हणतो.

पुढील काही महिन्यांमध्ये लीनचा कामामधील रस निघून गेला आणि त्याचा परिणाम त्याच्या कामावर झाला. एप्रिल २०२१ च्या परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये त्याला नोकरी टिकवायची असेल तर कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला गेला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात त्याने राजीनामा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडली तर त्याचा करियरवर आणि सामाजिक जीवनावर परिणाम होईल अशी लीनला भिती वाटत होती. मात्र त्याच्या विरुद्धच घडलं. “मी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि अधिक लोकांना भेटलो, इतर नवउद्योजकांच्या ओळखी झाल्या. मला लेखक आणि कंटेटं क्रिएटर्सही भेटले,” असं लीन सांगतो. आता लीन फार समाधानी आहे असं सांगतो. “नेटफ्लिक्समधील नोकरी सोडून आठ महिने झाले आहेत. आता मी स्वत:साठी काम करतोय. मी केवळ सुरुवात केली असून सध्या कमाईचं साधनं म्हणावी तशी उपलब्ध नाहीत. पण मी उत्साहाने काम करण्यावर ठाम असून माझ्यासोबत नक्कीच काहीतरी चांगलं होईल यावर माझा विश्वास आहे,” असं लीन सांगतो.