ऑनलाइन ऑर्डर केलेल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी अनेकदा खराब किंवा एक्स्पायर झालेल्या येतात. अशा वेळी या पदार्थांचे पैसे रिफंड कसे मिळवायचे हे समजत नाही; पण अनेक ग्राहक आजकाल विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेत संबंधित कंपनीला खराब प्रॉडक्टची माहिती देत ‘रिफंड’ची मागणी करतात. अशाच प्रकारे एका ग्राहकाने फ्लिपकार्टवरून ऑनलाइन मखाना ऑर्डर केला होता; पण ऑर्डर स्वीकारल्यानंतर पाच दिवसांनी जेव्हा त्याने ते पाकीट उघडले, तेव्हा तो खूप घाबरला. कारण- त्या पॅकेटच्या आत आणि बाहेर किडे होते. मखान्यात किडे रेंगाळत असल्याचे पाहून ग्राहकाने याबाबत तक्रार केली. याच तक्रारीशी संबंधित एक पोस्ट आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
ग्राहकाने त्या पाकिटातील मखान्याचा एक फोटो काढून तो ट्विटरवर पोस्ट केला आणि संपूर्ण प्रकरण सांगितले आहे. सिद्धार्थ शाह नावाच्या एका युजरने आपला ऑर्डर नंबर देत लिहिले की, मी फ्लिपकार्टवरून फार्मले प्रीमियम फूल मखाना ऑर्डर केला. जेव्हा मी पॅकेट उघडले तेव्हा मला त्यात किडे दिसले. हे सर्व भयंकर होते. याव्यतिरिक्त या प्रॉडक्टसाठी कोणतीही रिटर्न पॉलिसीही नाही.
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मखान्यात छोटे किडेही दिसत आहेत. सिद्धार्थने पुढे लिहिलेय की, फ्लिपकार्ट माझ्या कस्टमर केअर कॉलला उत्तर देत नाही. कृपया माझे पैसे परत करा.
फ्लिपकार्टने दिले असे उत्तर
त्यानंतर फ्लिपकार्ट सपोर्टकडून रिप्लाय आला की, ऑर्डरचा तपशील खासगी चॅटमध्ये शेअर करण्यासाठी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यावर असेही म्हटले की, युजर्सनी X वर ऑर्डर डिटेल्स टाकू नयेत. कारण- ते प्रत्येक जण पाहू शकतात. तसेच शेअर केलेल्या ऑर्डरचे डिटेल्स हटवण्यास सांगितले. शेवटी सिद्धार्थने एक अपडेट शेअर केले आणि लिहिले, अपडेट : फ्लिपकार्टने या ऑर्डरसाठी रिफंड दिला आहे. सपोर्टबद्दल सर्वांचे आभार!
मखानामध्ये किडे पाहून युजर्स म्हणाले….
या प्रकरणावर युजर्सनी विविध प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. एका युजर्सने लिहिलेय की, भाऊ, फ्लिपकार्टवरून कोणतेही खाद्यपदार्थ मागवू नका. माझ्या बाबतीतही असेच घडलेय. मला एक एक्स्पायर वस्तू पाठवली. दुसऱ्या युजरने गमतीने लिहिलेय की, कंपनी नॉनव्हेज मखाना विकतेय का? तिसऱ्या युजरने लिहिले की, काही गोष्टी ऑफलाइन खरेदी करणे चांगले.
सिद्धार्थ शाहने २५ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर मखानासंदर्भातील पोस्ट केली होती. त्यानंतर सिद्धार्थला मखान्याच्या पॅकेटचे पैसे परत मिळाले. परंतु, लोकांकडून विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीचे फायदे आणि तोटे यावर वादविवाद सुरूच आहेत. यावर तुमचे काय मत आहे? कृपया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा.