Video : झोमॅटो, स्विगी (Zomato,Swiggy) अॅपवर स्क्रोल करताना तुम्हाला एखादा खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा झाली की, तुम्ही लगेच ऑनलाइन ऑर्डर करता. तसेच हे पदार्थ तुम्हाला घरी पोहचवण्याचं काम कंपनीचा डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) अगदी चोख करत असतो. या डिलिव्हरी बॉयला पदार्थ घेऊन येण्यास उशीर झाला किंवा तो चुकीच्या पत्त्यावर गेल्यास आपण अनेकदा त्यांच्यावर ओरडतो किंवा त्यांच्याशी उद्धट बोलतो; पण हे डिलिव्हरी बॉय नेहमीचं पाठीवर ओझं घेऊन, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून घरोघरी पार्सल पोहचवण्याचे काम करत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक अज्ञात व्यक्ती डिलिव्हरी बॉयला सरप्राईज देतो आणि स्वतःच्या गाडीतून फिरायला घेऊन जातो.
डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीचे पार्सल देण्यासाठी एका गाडीजवळ येतो. पार्सल घेतल्यानंतर अज्ञात व्यक्ती डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारते. त्यानंतर माझ्या लँबॉरगिनी (Lamborghini) गाडीत बसणार का असे विचारते ? त्यावर थोडा विचार करत डिलिव्हरी बॉय ‘हो’ असे उत्तर देतो आणि पाठीवरील बॅगचे ओझं त्याच्या दुचाकीवर ठेवून गाडीत बसायला येतो. तसेच अज्ञात व्यक्ती लँबॉरगिनी गाडीतून डिलिव्हरी बॉयला फिरायला घेऊन जाते. आपले पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अज्ञात व्यक्ती कशाप्रकारे सन्मान देते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.




व्हिडीओ नक्की बघा :
लँबॉरगिनी गाडीतून डिलिव्हरी बॉयला नेलं फिरायला :
डिलिव्हरी बॉय जेव्हा गाडीत बसतो तेव्हा अज्ञात व्यक्ती त्याला सीटबेल्ट लावण्यास सांगते आणि म्हणते, “तू दिवसभर सगळ्यांचे पार्सल घरोघरी पोहचवत असतो म्हणून आज तुला हे खास सरप्राईज दिलं आहे” अशा शब्दात सन्मान देऊन अज्ञात व्यक्ती डिलिव्हरी बॉयचे कौतुक करते आणि त्याला स्वतःच्या महागड्या गाडीतून थोड्या वेळासाठी फिरायला घेऊन जाते. यादरम्यान डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हीसुद्धा काही क्षणासाठी भावुक व्हाल.
युजरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ @saboonishant या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘प्रत्येक युनिफॉर्मचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करा… #आदर’ असे खास कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. झोमॅटो कंपनीचे पार्सल घरोघरी पोहचवणारा डिलिव्हरी बॉय हे खास सरप्राईज पाहून आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस आहे हा… कधी विचार नव्हता केला की, कधी लँबॉरगिनी या गाडीतसुद्धा बसेन, अशा आपल्या भावना व्यक्त करत डिलिव्हरी बॉय अज्ञात व्यक्तीचे आभार मानतो आणि खूप खुश होतो.