Lucknow Mango Loot Viral Video : तुम्ही लुटमारीच्या अनेक घटना पाहिल्या असतील, ज्यात चोर लोकांच्या हातातील बॅग, पैसे किंवा महागड्या वस्तू पळवताना दिसतात. यात चोर भररस्त्यात धारधार शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करतात. या लुटमारीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या अशाच एका लुटमारीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात लोकांनी पैसे, मौल्यवान वस्तू नाही तर चक्क आंब्याची लूट केलीय. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून हसू येईल, पण शेकडो लोक एकाचवेळी हजारो आंबे घेऊन पळताना दिसतायत.

शेकडो लोक प्रदर्शनात ठेवलेल्या आंब्यांवर पडले तुटून

आंब्याच्या लुटमारीची ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे, जिथे नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंबा महोत्सवाचे उद्घाटन केले. या आंबा महोत्सवात जगभरातील वेगवेगळ्या प्रजातीच्या आंब्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मात्र, आंबा महोत्सवाची सांगता होताच तिथे एक भलतीच घटना घडली. आंबा महोत्सवाचा समारोप जाहीर होताच शेकडो लोक प्रदर्शनात ठेवलेल्या आंब्यांवर अक्षरश: तुटून पडले. लोकांनी प्रदर्शनात ठेवलेले सर्व आंबे लुटून नेले, त्यामुळे हा आंबा महोत्सव होता की लुटीचा कार्यक्रम हेच कळत नव्हते.

आंब्यांनी भरलेले सर्व टेबल काही सेकंदात रिकामे

आंब्याच्या लुटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लोक प्रदर्शनात ठेवलेले सर्व आंबे लुटताना दिसत आहेत, ज्यात त्यांनी आंब्यांनी भरलेले सर्व टेबल काही सेकंदात रिकामे केले. महिला असोत, मुले असोत किंवा वृद्ध असोत, ज्यांना संधी मिळाली ते लोक आंब्यांच्या लुटीत सहभागी झाले होते, त्यामुळे तिथे आंबे लुटण्यात कोणीही मागे राहिले नाही.

लखनऊच्या अवध शिल्पग्राममध्ये ४ जुलै ते ६ जुलैदरम्यान आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ७ जुलै २०२५ हा आंबा महोत्सवाच्या शेवटचा दिवस होता, त्याचदरम्यान आंब्यांच्या लुटीची घटना घडली. हे आंबे फक्त प्रदर्शनात लोकांना पाहण्यासाठी ठेवले होते, तर या प्रदर्शनाबाहेर वेगवेगळ्या स्टॉलवर ते विकले जात होते. पण, लोकांनी अतिशय वाईटप्रकारे प्रदर्शनातील आंबे पळवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातून विविध प्रकारचे आंबे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या आंबा महोत्सवात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. परंतु, कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि गर्दीवर नियंत्रण नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.