Virar Auto Driver Marathi Language Issue Viral Video: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सतत काही ना काही वाद होत आहे. मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी ही प्रकरण वाढत चालली आहेत.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या धोरणाला सर्व स्तरावरून विरोध झाला असून आता मराठी भाषेसाठी मुंबईकर धडपड करताना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक रिक्षाचालक मराठीत बोलण्याची मनाई करत आहे.
मराठीवरून रिक्षाचालकाचा वाद (Virar Auto Driver Marathi Controversy Video)
विरारमधील एका धक्कादायक घटनेत, भाषेवरून रिक्षाचालकाने एका माणसावर दादागिरी केली आहे. या घटनेचा व्हिडीओ त्या माणसाने रेकॉर्ड केला आणि तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तो माणूस म्हणाला, “मी यूपीचा राहणारा आहे झांसी बहुराणीपूर. काल माझ्याबरोबर अशी घटना घडली की मी माझ्या बहिणीबरोबर स्टेशनला जात असताना एक रिक्षाचालक मला ओव्हरटेक करून पुढे गेला. मी त्याला एवढंच नेमकं म्हटलं होतं की, तुला ऑटो नीट चालवता येत नाही का?”
“तर तो मला बोलला की हिंदी में बात कर मुझे मराठी नही आता. त्याच्यामुळे मी गाडी त्याच्यापुढे लावली आणि म्हणालो की तुला मराठी का नाही येत, का नाही मराठी बोलायची तुला….”
“तर यावर तो बोलला, मी मराठी बोलणारच नाही, हिंदी में ही बात करूंगा, भोजपूरी में ही बात करूंगा. त्याचा व्हिडीओसुद्धा मी काढलेला आहे. हे सगळं घडत होतं तेव्हा इतरही रिक्षाचालक तिथे होते तेही यूपीचे होते ते ही माझ्या अंगावर आले.”
“या सगळ्यात माझी बहिण मध्ये आली तर तिलाही धक्काबुक्की करून बाजूला केलं गेलं, आणि मी जेव्हा व्हिडीओ काढत होतो तेव्हा त्यांनी माझ्या हातावर मारून माझा फोन खाली टाकला. आणि तिथे कोणीही आलं नाही. त्यानंतर तिथे ट्रॅफिक पोलीस आला आणि त्याने आम्हा दोघांना दूर केलं.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @metrocitysamachar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.२ मिलियनच्या वर व्ह्यूज आले आहेत. तसंच “विरारमधील रिक्षाचालक हिंदी बोलण्यावर ठाम – म्हणाला ‘मी मराठी बोलणार नाही, मीडियाला बोलवा!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Auto Driver Insist on Speaking Hindi Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अरे, हिंदी आणि मराठीवरून असे भांडू नका यार.”, तर दुसऱ्याने “पूर्ण पालघर जिल्ह्याची वाट लावून टाकली आहे परप्रांतीय लोकांनी भरून” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “महाराष्ट्रात फक्त मराठीच” तर एकाने “खूप छान मित्रा, जय महाराष्ट्र मराठी आलीच पाहिजे” अशी कमेंट केली.