Sachin 50th Birthday: क्रिकेटचा देव असं ज्या सचिनचं वर्णन केलं जातं त्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकर हा ५० वर्षांचा झाला आहे. अगदी काल काल पर्यंत तर आपण सचिनला खेळताना पाहात होतो असं वाटणारे अनेक चाहते आहेत. याच चाहत्यांकडून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. शतकांच्या शतकाला गवसणी घालणारा आपला सचिन अस्सल खवय्याही आहे. त्याला दोन पदार्थ प्रचंड आवडतात. त्याच्या वाढदिवशी त्याच्या दोन आवडत्या खाद्यपदार्थांचीही चर्चा होते आहे. सचिनचा भाऊ नितीन तेंडुलकर यांनीच ही आठवण सांगितली आहे.
काय म्हणाले होते नितीन तेंडुलकर?
सचिनला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. सचिननने जगभरात नाव कमवलं पण तो अजिबात बदलला नाही. तो जसा होता तसाच राहिला. सचिनला गाण्यांचीही खूप आवड होती. आम्ही जेव्हा मोठ्या आवाजात गाणी लावायचो तेव्हा सगळ्यांनाच कळायचं की सचिन दौरा करून आला आहे. त्यावेळी रात्री उशिरा आजी आम्हाला चहा करून द्यायची असं नितीन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं.
खवय्या सचिन ही त्याची आणखी एक ओळख
सचिन तेंडुलकर हा उत्तम खवय्या आहे. त्याला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो. वांद्रे या ठिकाणी मिळणारी चिकन बिर्याणी त्याला खास करून पसंत होती. एवढंच नाही तर आईच्या हातची वांग्याची भाजी, अळूची भाजी सचिन आवडीने खात असे. एकदा सचिन भेंडीची भाजी खाऊन आला आणि आम्हाला घरी येऊन सांगितलं की मी बेडकाची भाजी खाऊन आलो आहे. आम्ही सगळे थोडे गोंधळलो. मग आमचे चेहरे बघून सचिनने सांगितलं की तो भेंडीची भाजी खाऊन आला आहे. मात्र वांद्रे येथील बिर्याणी आणि वडा-पाव हे दोन्ही सचिनचे अत्यंत आवडते पदार्थ आहेत. डाएटवर असताना मात्र तो खाण्यावर नियंत्रण ठेवत असे आणि कडक नियम पाळत होता असंही नितीन तेंडुलकर यांनी सांगितलं.
क्रिकेट खेळणे हे त्याच्या आयुष्यातील अंतिम ध्येय होते. लहानपणी तो अतिशय लाजाळू होता. टॉम ऑल्टरसोबतच्या पहिल्या मुलाखतीत सचिन फार काही बोलला नव्हता. परंतु आपल्याला या पुढेही अनेक मुलाखती द्याव्या लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आत्मविश्वास वाढवला आणि धीटपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली असंही नितीन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं.