प्रत्येक व्यक्तीसाठी कुटुंब हे सर्वस्वी असतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जिव्हाळा असल्याने त्यांची काळजी असते. कुणाला घरी येण्यास उशीर जरी झाला तरी धाकधूक होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एनबीसी वॉशिंग्टनचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ डग कॅमरर यांनी थेट प्रसारणादरम्यान कुटुंबाला त्यांच्या घराकडे येणाऱ्या चक्रीवादळाबद्दल इशारा दिला. कॅमरर ३१ मार्च रोजी लाइव्ह हवामान अहवाल सादर करत होते. जेव्हा त्यांना राष्ट्रीय हवामान खात्याने जारी केलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्याबद्दल कळले. एनपीआरनुसार, चक्रीवादळाचा मार्ग त्याच्या घराच्या दिशेने होता. यामुळे धास्तावलेल्या कॅमरर यांनी प्रक्षेपणादरम्यान आपल्या मुलाला कॉल केला आणि याबाबतची माहिती दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत वादळाचा मार्ग दाखवणारा नकाशा दिसत असून कॅमरर फोनवर बोलत आहेत.
“तुला जमेल तितक्या लवकर खाली जा. आताच्या आता उतरा. लगेच बेडरूममध्ये जा आणि फक्त १५ मिनिटात आवरा. आत्ताच करा,” असं बोलताना कॅमरर व्हिडीओमध्ये दिसत आहेत. “मला माझ्या मुलांना माहिती द्यायची आहे. ते कदाचित ऑनलाइन गेमिंग करत आहेत आणि या बातम्या पाहात नाहीत,” असंही ते पुढे म्हणाले.
यानंतर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना, “ते सुरक्षित आहेत” अशी माहिती दिली. या निर्णयाचे कौतुक करताना एका युजर्सने सांगितलं की, “तुमच्या मुलांना धोक्याची सूचना देण्यात काही गैर नाही.” दुसर्या युजर्सने ब्रॉडकास्टरला टॅग केले आणि त्याचे कौतुक केले “दर्शकांना ते दाखवून एक उदाहरण दिल्याबद्दल आणि कॅमेरा रोलिंग ठेवल्याबद्दल!”
या घटनेनंतर एका युजर्सने ब्रॉडकास्टरला फॉलो करायला सुरुवात केली आणि लिहिले, “तुम्ही कामावर असताना तुमच्या मुलांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कॉल करत असल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला फॉलो करायला सुरुवात केली. मला आशा आहे की कुणीही व्यक्ती तुमच्यावर टीका करणार नाही. अशा परिस्थितीत कोणताही पालक आपल्या मुलांसाठी हेच करेल. आशा आहे की सर्व ठीक आहे.”