Delhi Metro Shocking Video : मेट्रोसंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर; तर काही फार विचित्र किंवा धक्कादायक असतात. काही वेळा मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना फार धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागतो. एका महिलेच्या बाबतीतही तेच घडले, रात्री ११ च्या सुमारास ती मेट्रोने प्रवास करत होती; पण आत शिरताच जे दृश्य तिने पाहिले, ते पाहून तिला धक्काच बसला. याबाबत तिने एक्सवर एक पोस्ट केली आहे, यात तिने नेमके काय म्हटलेय ते जाणून घेऊ…
संबंधित महिला दिल्ली मेट्रोने रात्री ११ च्या सुमारास प्रवास करता होती, ज्यावेळात सहसा मेट्रोमध्ये गर्दी नसते. पण जेव्हा ती कोचमध्ये शिरली तेव्हा काही पुरुष महिला कोचमध्ये प्रवेश करून आरामात बसलेले दिसले. हे पाहून तिला प्रवास करतानाही असुरक्षितता वाटत होती. यावेळी तिने मोबाईल कॅमेऱ्याने संपूर्ण दृश्य रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केले. ते आता व्हायरल होत असून, लोक त्यावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोचे इतर सर्व कोचही रिकामे आहेत, तरीही काही पुरुष थेट महिला कोचमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती किंवा लाज नाही, ते आरामात बसून प्रवास करतायत; पण त्यामुळे महिला कोचमध्ये बसलेल्या इतर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती, पण पुरुषांना त्याची पर्वा नाही. हा व्हिडीओ बनविणाऱ्या महिलेने स्वतः म्हटले आहे की, ही सुरक्षेतील मोठी चूक आहे आणि प्रश्न असा आहे की, संपूर्ण मेट्रो रिकामी असतानाही या पुरुषांना महिला कोचमध्ये का प्रवेश करावासा वाटतो.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, महिलांचा डबा फक्त महिलांसाठी राखीव आहे; पुरुषांना प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित आहे. असे असूनही अशा घटना घडणे हे दर्शविते की, नियम गांभीर्याने घेतले जात नाहीत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ negi.aditi_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर एका युजरने कमेंट केली की, भारतीय पुरुष कधीही सुधारणार नाहीत. दुसऱ्याने लिहिले की, जेव्हा संपूर्ण मेट्रो रिकामी असेल तेव्हा महिलांच्या कोचमध्ये येण्याचा हेतू काहीतरी वेगळाच असेल. तर तिसऱ्याने लिहिले की, मेट्रोमध्येही महिलांच्या कोचमध्ये सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत.