संपूर्ण देशाचं राजकारण हे उत्तर प्रदेशवर अवलंबून असतं. सर्वाधिक लोकसभेच्या जागा आणि सर्वात मोठी विधानसभा म्हणून या राज्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. राजकीय जाणकार उत्तर प्रदेशकडे लोकसभेच्या दृष्टीकोनातून पाहतात. त्यामुळे भाजपासह इतर पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आता निवडणूक निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. या निकालात भाजपा आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज येणार हे स्पष्ट आहे. यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भाजपच्या विजयासाठी विशेष यज्ञ आयोजित करण्यात आला होता. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी हा यज्ञ करण्यात आला. बागला मुखी धाम येथे रात्री १० ते ३ या वेळेत 'मिरची यज्ञ' करण्यात आला. पीर रामनाथ महाराज देखील नाथ संप्रदायाचे आहेत आणि योगी आदित्यनाथ देखील नाथ संप्रदायातील आहेत. अशा परिस्थितीत यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्या विजयासाठी यज्ञ-हवन सोहळा पार पडला. सर्वप्रथम योगी आदित्यनाथ यांच्या विजयाचा संकल्प घेऊन यज्ञ सुरू करण्यात आला. या यज्ञ कार्यक्रमात ११ पुरोहितांनी भाग घेतला होता. योगी आदित्यनाथ विजयी होऊन पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहुती वेळी व्यक्त करण्यात आली. या यज्ञात १ क्विंटल मिरची व इतर साहित्याच्या माध्यमातून आहुती देण्यात आली. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.