चित्रपटाचा ट्रेलर दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद नागर नावाच्या आरोपीला नोएडा येथून अटक केली आहे. त्याच्या आणखी दोन साथीदारांचा तपास पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद आपल्या कंपनीच्या नावाने कार्यक्रम आयोजित करायचा. तिथे तो लोकांना काही चित्रपटांचे ट्रेलर दाखवयचा. त्यानंतर तो त्यांना ११ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवायचा. लोक त्याच्या आमिषाला बळी पडायचे आणि कंपनीत लाखो रुपये गुंतवायचे.
दरम्यान, लोकांनी ११ महिन्यांनंतर फोन केल्यानंतर तो त्याचे फोन उचलत नव्हता किंवा लोकांना संपर्क करता येऊ नये यासाठी आपला फोन नंबर बदलायचा. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात अनेकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना उदित ओबेरॉय, प्रमोद नागर ज्युनियर आणि प्रमोद नागर सीनियर यांनी केवळ लोकांची फसवणूक करण्यासाठीच केली होती. यातील काही लोक स्वत:ला बनावट चित्रपट निर्मिती कंपनीचे संचालक असल्याचं लोकांना सांगायचे. शिवाय, आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास आम्ही तुम्हाला ११ महिन्यांत दुप्पट पैसे मिळवून देतो असेही ते लोकांना सांगायचे. धक्कादायक बाब म्हणजे लोकांची फसवणूक करण्यासाठी हे लोक नियमित कार्यक्रम आयोजित करायचे. ते कार्यक्रमच्या ठिकाणी लोकांना काही चित्रपटांचे ट्रेलर दाखवायचे आणि आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ११ महिन्यांत दुप्पट पैसे मिळतील असे सांगायचे.
हेही पाहा- पोलिसांच्या जिप्सीवर चढून बिनधास्तपणे Reel बनविणाऱ्यांचा Video व्हायरल, रीलमधील गाणे ऐकून व्हाल थक्क
त्यांनी लोकांना आमिष दाखवल्यामुळे त्यांच्याकडे ४७ जणांनी तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जमा केले होते. सुरुवातीचे काही दिवस या लोकांना रिटर्न पैसेही मिळाले. पण काही दिवसांनी त्यांना पैसे मिळणे बंद झाले. त्यामुळे लोकांना संशय आला आणि कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कंपनीकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं समताच लोकांनी पोलिसांकडे जाऊन एफआयआर नोंदवला. पोलिसांनी प्रमोद नागरला ग्रेटर नोएडा परिसरातून अटक केली असून सध्या तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.