Emotional Animal Videos: एक शेतकरी ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत असतो… पण त्याच वेळी, मातीच्या ढिगाऱ्यात काहीतरी असं असतं जे त्याच्या लक्षात येत नाही… पुढच्या क्षणी, एक छोटासा जीव उभा राहतो, जणू मृत्यूशी दोन हात करायला तयार! तो जीवाची पर्वा न करता का उभा राहतो? आणि त्यानंतर शेतकरी काय करतो, हे पाहून तुमचे डोळेही पाणावतील…” नेमकं काय घडलं जाणून घ्या…
आई म्हणजे काय असतं हे परत एकदा समजून देणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ममता, धैर्य आणि नि:स्वार्थ प्रेमाचं जिवंत उदाहरण म्हणजे ‘आई.’ मग ती माणसांची असो, प्राण्यांची किंवा पक्ष्यांची. माय माऊलीच खरी.
व्हिडीओमध्ये आपण पाहतो की, एक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत असतो. पण त्या मातीच्या रांगेत, एका ठिकाणी एका पक्षिणीने आपली अंडी घातलेली असतात. जसा ट्रॅक्टर त्या दिशेनं येऊ लागतो, तसं तो पक्षी आपले पंख पसरवून ट्रॅक्टरसमोर उभा राहतो, अगदी जणू स्वतःची ढाल बनवून; आपल्या अंड्यांना वाचवण्यासाठी. शेतकरी नांगरणी करत असताना त्याच्या समोर उभं राहिलं ममतेचं जिवंत रूप.
हा प्रसंग पाहून मन सुन्न होतं, कारण हा पक्षी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता फक्त आपल्या अपत्यांचं रक्षण करत असतो. काही क्षणांसाठी सगळं थांबतं… ट्रॅक्टर जवळ येत असतो… पण…
पुढचं दृश्य अधिक भावनिक आहे. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे दृश्य पाहून हेलावतो. तो आपल्या ट्रॅक्टरला त्या जागी थांबवतो आणि त्या भागाला वगळून उरलेलं शेत नांगरतो. पक्ष्याची माया आणि शेतकऱ्याचा समजुतदारपणा याचं हे दृश्य प्रत्येकाला भावून जातं.
व्हिडीओच्या शेवटी तो पक्षी पुन्हा आपल्या अंड्यांवर शांतपणे बसतो, पण त्याची नजर मात्र अजूनही सावध आहे. तो हालचालही करत नाही. शेवटपर्यंत सजग राहतो.
शेतकऱ्याने काय केलं येथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओला आतापर्यंत आठ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून, ३३ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या, “डोळ्यात अश्रू आले”, “शेतकऱ्याला सलाम”, “आई ही आईच असते!”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्यात.
एक छोटेसे दृश्य, पण ममतेचा महासागर… आईच्या प्रेमासमोर जगात काहीच थिटं नाही, हे या व्हिडीओने पुन्हा सिद्ध केलं आहे.