Mother daughter video: आई आणि मुलांमधलं नातं हे या जगातलं सगळ्यात वेगळं आणि अतूट नातं आहे. आईची माया, तिचं प्रेम आणि तिचा त्याग हे कुठल्याही मापात मोजता येणारं नाही. आपल्या लेकरासाठी आई काहीही करू शकते, कितीही संकटं आली तरी ती मागे हटत नाही. अशाच एका आईच्या मायेचं उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकाचं मन भरून येतं.

या व्हिडीओमध्ये एक आई मुसळधार पावसात आपल्या लहान मुलीला खांद्यावर बसवून रस्त्यावरून जाताना दिसते. वरून ती हातात छत्री धरून मुलीला भिजण्यापासून वाचवते आहे. पावसाचा जोर असतानाही आईच्या चेहऱ्यावर हसू आहे. ती थकलेली नाही, त्रासलेली नाही, उलट ती क्षणाचा आनंद घेत आहे. मुलगी तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय आई तिला घेऊन जाते.

व्हिडीओमध्ये ही महिला अनवाणी रस्त्यावर चालताना दिसते. एका हातात छत्री आणि त्याच हाताने ती आपल्या मुलीला आधार देत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सांगतं, “माझं लेकरू सुरक्षित आहे, हेच माझं सुख!” पावसात चालतानाही आई-मुलीच्या चेहऱ्यावर हसू आहे, ही एक साधीच गोष्ट नाही तर एक भावनिक आठवण आहे.

हा व्हिडीओ @_vatsalasingh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. युजरने या पोस्टसोबत एक सुंदर कॅप्शन दिलं आहे, “महाराणी बनवून ठेव तिला, जिने तुला आयुष्यभर राजा म्हणून वाढवलं आहे.

पाहा व्हिडिओ

लोकांच्या प्रतिक्रिया भावनांनी भरलेल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या आईची सेवा करण्यात घालवले तरी तुम्ही तिचे ऋण कधीही फेडू शकणार नाही.” आणखी एका व्यक्तीने म्हटलं, “आई म्हणजे देवाचा दुसरा चेहराच आहे.” अनेकांनी या व्हिडीओला “मनाला स्पर्श करणारा”, “खऱ्या अर्थाने ममतेचं दर्शन” असं म्हणून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ फक्त एका घटनेचा नाही, तर प्रत्येक आईच्या अंतःकरणाचं प्रतिबिंब आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, आई नेहमी आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी तयार असते. तिच्या मायेच्या सावलीत मूल कधीही एकटं नसतं, म्हणूनच म्हणतात – “आईचे प्रेम या जगातील समुद्रापेक्षाही सर्वात खोल असते.”