आई तिच्या लेकरासाठी काहीही करु शकते असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय नुकताच झिम्बाब्वेमधील एका घटनेमधून आला. येथील एका महिलेने चक्क एका मगरीशी झुंज देत आपल्या तीन वर्षाच्या मुलाची मगरीच्या जबड्यामधून सुटका केली. डेली मेल युकेने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने मगरीच्या नाकामध्ये बोटे घातल्याने मगरीने जबड्यातील मुलाला सोडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वे आग्नेय भागातील गोनारझो राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये ही घटना घडली. येथे राहणाऱ्या मौरिना मुसीसियाना या महिला रॅण्डी नदीमध्ये मासेमारी करत होती. त्यावेळी तिची दोन्ही मुलं नदीच्या किनारी खेळत होती. अचानक या महिलेला मुलांच्या आरोडण्याचा आवाज ऐकू आला. तिने मुलांकडे धाव घेतली असता तिच्या तीन वर्षाच्या मुलाचे डोके मगरीच्या जबड्यामध्ये असल्याचे दिसले. ही मगर मुलाला पाण्यात खेचत होती. मौरिनाने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मगरीच्या नाकात बोटं घातल्यास तिला गुदमरल्यासारखं होईल आणि तिच्या जबड्याची पकड सैल होईल असा विचार मौरिनाने केला. मौरिनाने पुढचा मागचा विचार न करता ही कृती अंमलात आणण्याचे ठरवले. एक हाताची बोटं मगरीच्या नाकात घातली आणि दुसऱ्या हाताने मुलाला बाहेर खेचत होती. अखेर मौरिनाच्या प्रयत्नांना यश आले आणि मगरीच्या जबड्यामधून मुलाची सुखरुप सुटका झाली. मात्र पाण्यामध्ये जाण्याआधी मगरीने मौरिनाच्या हाताचा चावा घेतला.
“मी मगरीचे नाक दाबले. मगरीचे नाक दाबले की तिच्या जबड्याची पकड सैल होते असं मला लहानपणी सांगण्यात आलं होतं. तेच मी केलं,” असं मौरिनाने ‘मिरर’शी बोलताना सांगितलं. मगरीने डोकचं जबड्यात पकडल्याने मौरिनाचा मुलगा जीडीऑनला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं आहे. “मी माझ्या मुलाला मगरीच्या तावडीतून सोडवलं यावर माझा असूनही विश्वास बसत नाहीय,” असं मौरिनाने रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झेबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.
अशाप्रकारे चिरिड्झी प्रांताच्या पूर्व भागामधील रॅण्डी नदीमध्ये अनेकदा लोकांवर मगरी हल्ला करतात. मासेमारी करताना किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना अनेकांवर मगरींने हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत असं झेबीसी न्यूजने म्हटलं आहे. तर वर्षाला २०० हून अधिक जण मगरींच्या हल्ल्यांमध्ये जखमी होतात. येथील मगरी माणसांवर हल्ला करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, असं डेली मेल युकेनं म्हटलं आहे.