Viral Video Pit Bull Attacking An 11 Year Old Boy : प्राण्यांवर जीव लावणारी, तर प्राण्यांना घाबरणारी मंडळी असतात. “आमचा श्वान कोणाला चावत नाही. अरे, तो काहीच करीत नाही. तू घाबरलास, तर तो तुझ्या अंगावर येणार”, असे श्वानमालक आवर्जून इतरांना सांगत असतो. पण, काही जण मुद्दाम प्राण्यांना घाबरणाऱ्या व्यक्तींवर श्वान सोडतात किंवा त्यांना आक्रमक करण्याचा प्रयत्न करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक श्वानमालकाने हद्दच पार केली आहे.

व्हायरल व्हिडीओ मुंबईतील मानखुर्द परिसरातील आहे. १७ जुलै रोजी ११ वर्षांचा हमजा नावाचा मुलगा पार्क केलेल्या एका रिक्षात खेळत होता. तिथे ४३ वर्षीयमोहम्मद सोहेल हसन नावाचा मालक आपल्या श्वानाला (पिटबुल) घेऊन रिक्षात गेला. श्वानाला पाहून मुलगा घाबरून रिक्षाच्या मागे आश्रय घेतो. पण, मोहम्मद सोहेल हसन श्वानाला मुलाच्या अंगावर सोडण्याचा आणि त्याला आक्रमक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर यादरम्यान श्वान त्या चिमुकल्याच्या हनुवटी आणि मानेला चावताना दिसत आहे. चिमुकला त्या श्वानाला पाहून प्रचंड घाबरला होता. तो आपली सुटका करून घेण्यासाठीही धडपडत होता.

पण, मोहम्मद सोहेल हसन हा प्रसंग पाहून कोणताही हस्तक्षेप करीत नव्हता किंवा श्वानाचा पट्टाही धरत नव्हता. तो फक्त आणि फक्त त्या प्रसंगाची मजा घेत होता. काही सेकंदांनंतर चिमुकल्याच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि श्वान चिमुकल्याच्या हनुवटीला, मानेला चावण्यासाठी उडी मारताना दिसतो. श्वान चिमुकल्याचे कपडे पकडत असताना तो गाडीतून पळून जाण्यात यशस्वी होतो. पण, त्यानंतरही श्वान त्याच्या मागे धावत-पळत जाताना दिसतो आहे; जे पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

सगळे फक्त व्हिडीओ काढत होते (Viral Video)

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिमुकल्याने सांगितल्यानुसार, त्याच्या हनुवटीला दुखापत झाली, त्याचे कपडेही श्वानाने ओढले. त्याने मालकाला मदत करण्याची विनंती केली. पण, तो हसत राहिला. परिसरातील कोणीही चिमुकल्याला मदत करण्यासाठी पुढे आले नाही. सगळे फक्त व्हिडीओ काढत होते, असे त्याने सांगितले आहे. दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी श्वानमालक हसनविरुद्ध गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @MeghUpdates या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पार्क केलेल्या रिक्षात खेळत असलेल्या चिमुकल्यावर मालकाने श्वान सोडला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. माहितीनुसार मालकाला प्राण्यांची काळजी न घेता त्याला सोडून देणे, एखाद्याला किरकोळ दुखापत होणे या संदर्भात त्याच्यावर कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे’. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.