Mumbai Youth Fails To Get Job In US Despite Spending Rs 50 Lakh: एका भारतीय वंशाच्या तंत्रज्ञ महिलेने असा दावा केला आहे की, अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे बहुप्रतिक्षित “अमेरिकन स्वप्न” भंग पावत आहे. त्यांनी एका पदवीधराची गोष्ट शेअर केली आहे, जो आता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कर्जाच्या ओझ्याखाली अडकला आहे आणि त्याला नोकरीही मिळेना झाली आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील या महिला तंत्रज्ञांने लिहिले की, तिच्या ओळखीच्या एका विद्यार्थाने अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पदवी पूर्ण केल्यापासून त्याला अद्याप एकही नोकरी मिळालेली नाही. यामुळे त्याला रिकाम्या हाताने मुंबईत परतणे भाग पाडले, तो आता एका भारतीय स्टार्ट-अपमध्ये महिन्याला फक्त २०,००० रुपये कमवत आहे, तर त्याचे निवृत्त वडील त्यांच्या पेन्शनमधून शैक्षणिक कर्जाचा ७५,००० रुपये मासिक हप्ता भरतात.
“ही अशी गोष्ट आहे, जी विद्यापीठे तुम्हाच्या कानावर येऊ देऊ इच्छित नाहीत”, असा या महिला तंत्रज्ञाने त्यांच्या व्हायरल पोस्टमध्ये दावा केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “अमेरिकेत त्याने फक्त पदवीचा टप्पा पार केला. ६०,००० डॉलर्सची पदवी, ५० लाख रुपयांचे कर्ज आणि कोणत्याही नोकरीशिवाय तो मुंबईला परतण्यासाठी विमानात चढला.”
या महिला तंत्रज्ञाने पुढे असा दावा केला की, या विद्यार्थ्याची अडचण ही एखादी अपवादात्मक गोष्ट नाही, तर आता वेगाने वाढणारी एक वास्तविकता आहे. कारण एकेकाळी आंतरराष्ट्रीय पदवीधरांसाठी भक्कम असलेले अमेरिकेतील नोकरीचे मार्केट आता घटत चालले आहे.
या तंत्रज्ञ महिलेने हे मान्य केले की, अमेरिकेत अजूनही जागतिक दर्जाचे संशोधन, गुणवत्ता-आधारित कार्यसंस्कृती आणि प्रगतीची संधी मिळते, पण “जेथे एकेकाळी प्रत्येक पदवीधराला सहज नोकरी मिळत होती, ते नोकरीचे मार्केट आता झपाट्याने बदलत आहे.”
या पोस्टमुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अनेकांनी त्यांना आलेले अशा प्रकारचे अनुभव शेअर केले आहेत.
एका युजरने लिहिले की, खूप छान! आपल्याला फक्त आकर्षक लिंक्डइन ‘सक्सेस स्टोरी’ नव्हे तर अधिक प्रामाणिक गोष्टी हव्या आहेत.”
दुसऱ्याने म्हटले, “भारतात शिक्षण चांगले आहे, पण ते तिथे त्यांच्या मेंदूचा वापर करत नाहीत. खूप पूर्वी, लोक अमेरिकेत जाऊन मोठ्या पगाराची बढाई मारत असत. तो काळ वेगळा होता. जर आत सर्वजणच तिथे गेले तर सर्वांना नोकऱ्या कशा मिळतील?”