प्रत्येक शहराची आपली एक खास ओळख आहे. त्यांची स्वत:ची वेगळी खाद्यसंस्कृती आहे. याच प्रकारे महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार मटन, चिकन बनवण्याची जशी वेगळी पद्धत आहे, तशी पोळी बनवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास पद्धत वापरली जाते. त्यात पोळीमध्ये विदर्भातील मांडे अर्थात मटका रोटी खूप प्रसिद्ध आहे. या लांब पोळीमुळे जगभरात नागपूरची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. गरमागरम माठावर तयार होणाऱ्या विदर्भातील या पोळीला मटका रोटी, असेही म्हटले जाते. ही रोटी रुमालापेक्षाही अतिशय पातळ असते; तसेच तिची बनवण्याची पद्धत पाहूनच तुम्हाला खाण्याची इच्छा होईल. पण, ही मटका रोटी नेमकी कशी बनली जाते ते कधी पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यात मटका रोटी नेमकी कशी बनवली जाते ते दाखवले आहे.

या आगळ्या वेगळ्या पोळीला विदर्भात मटका रोटीबरोबरच मांडे, लंबी रोटी असेदेखील म्हणतात. रुमाली रोटीसारखी दिसणारी ही रोटी गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. मटका रोटी बनवण्यासाठीही एक स्पेशल माठ वापरला जातो. पण, ही रोटी तयार करणे हे कौशल्याचे काम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वांत आधी गहू बारीक दळून १५ – २० मिनिटे भिजत ठेवले जातात. त्यानंतर मोठ्या परातीमध्ये पिठात पाणी घेऊन पीठ भिजवले जाते आणि ते पीठ वारंवार आपटून मळले जाते. हे पीठ चिकट होईपर्यंत आपटून मळून घेतले जाते. त्यासाठी भरपूर पाणी वापरून पीठ पातळ बनवले जाते. त्यानंतर पिठाचा गोळा हातावर रुमालासारखा पसरट करून अलगद माठावर टाकला जातो. त्यात अनेक महिला सक्रिय सहभाग घेत मांडे बनवीत आहेत. या महिला कुशलतेने अत्यंत पातळ रोटी तयार करून, त्या माठाच्या गोलावर टाकत आहेत. या रोट्या पूर्णपणे भाजल्यानंतर त्या काळजीपूर्वक माठावरून काढल्या जातात. अशा प्रकारे ही मटका रोटी तयार होते.