कर्नाटकातील सात लाख गावांमध्ये अद्याप वीज न पोहोचल्याने ती अंधारात असल्याची वस्तुस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत मांडली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजनांवर भर दिला. अर्थात त्यांनी दिलेल्या या ‘ताज्या आकडेवारी’ची दखल एका इंग्रजी वृत्तवाहिनीने घेतली. त्यावर ‘ट्विटर’वर मोठा गदारोळ माजला. अवघ्या देशात गावांची संख्या सहा लाख ४० हजार ८६७ इतकी असताना एकटय़ा कर्नाटक राज्यात सात लाख गावे आलीच कुठून? पंतप्रधानांनी सर्वाच्याच ज्ञानात नव्याने भर घातली हे एक बरेच झाले. टोमणे मारणे सुरू झाले. त्याला अनेकांनी ‘रिट्विट’ करून मोदींच्या गुजरात राज्यातच काही ठिकाणी कसा अंधार आहे, याचे काही साधार पुरावे सादर केले.
पण ज्या इंग्रजी वृत्तवाहिनीवर ‘सात लाख गावे अंधारात’ ही ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकली, ती चुकीचा होती, असे नंतर अनेकांच्या लक्षात आले. मोदी कर्नाटकातील विजेच्या स्थितीबाबत नेमके काय म्हणाले, याची जराही शहानिशा न करता वाहिनीच्या ‘अधीर संपादकां’नी बातमी दिली. खरे तर मोदींनी ‘कर्नाटकातील सात लाख घरां’मध्ये अद्याप वीज पोहोचली नसल्याचे विधान केले होते.