कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विश्वास नांगरे पाटील एकदम वेगळ्या मूडमध्ये दिसत असून ते चक्क नाचत आहेत. एका खासगी कार्यक्रमातील हा व्हिडीओ असल्याचं दिसत असून विश्वास नांगरे पाटील अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटातील ‘बाला’ गाण्यावर नाचत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचा हा वेगळा अंदाज पाहून नेटकरीही त्यांचं कौतूक करत आहेत.
नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा हा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. विश्वास नांगरे पाटील यांना अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखलं जातं. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांना आदर्श मानतात. सोशल मीडियावर त्यांची भाषणं नेहमी व्हायरल होत असतात. यावेळीही त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे मात्र निमित्त वेगळं आहे. त्यांचा हा वेगळा अंदाज पाहून अनेकजण त्यांचं कौतूक करत आहेत.
कोण आहेत विश्वास नांगरे पाटील ?
विश्वास नांगरे पाटील यांना धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे विश्वास नांगरे पाटील यांनी खडतर प्रवास करत यश मिळवलं आहे. याचा अनेकदा त्यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक तरुणांना ते मदतदेखील करतात.
विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
– लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
– अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
– पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– मुंबई पोलीसदल उपायुक्त
– ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
– पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र