भारतात चहाप्रेमींची काही कमी नाही. तुम्हाला प्रत्येक नाक्यावर एक तरी चहाची टपरी, दुकान पाहायला मिळेल. पण, प्रत्येक ठिकाणी चहा बनवण्याच्या पद्धती मात्र अगदी वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी दुधापासून चहा बनवतात, तर काही ठिकाणी पाण्यात विविध गोष्टी मिसळून चहाचा हटके प्रकार तयार केला जातो. यात काही लोकांना कमी तर काहींना जास्त साखरेचा चहा प्यायला आवडतो. पण, आजवर तुम्ही चहाचे इतरही अतिशय भन्नाट प्रकार पाहिले असतील. पण, तुम्ही कधी दारू वापरून तयार केलेला चहा पाहिला आहे का? नाही ना… पण, सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका टपरीचालकाने चक्क ओल्ड मंक दारू वापरून एक फक्कड तंदुरी चहा बनवला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस आधी आगीच्या भट्टीत कुल्हड गरम करत आहे. त्यानंतर तो जळत्या कुल्हडमध्ये ओल्ड मंक दारू टाकून चांगली गरम करतो; त्यानंतर त्यात गरमागरम चहा ओततो. चहा बनवताना माणूस काहीतरी बडबडत आहे. त्याच्या चहाच्या दुकानाच्या मागे लिहिलेले आहे, कॅफे अगुआडा… यावरून हे दुकान गोव्यातील असल्याचा अंदाज लावला जात आहे. कारण तिथेच अगुआडा किल्ला आहे.
हा व्हिडीओ @desimojito या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, त्याचा जोडीदार ओल्ड मंकची फिल्टर कॉफी बनवतो. दुसऱ्या एकाने लिहिले की, कुल्हड चहाचा संबंध भावनांशी आहे. यावर तिसऱ्या युजरने लिहिले की, त्याने हा चहा प्यायला आहे आणि त्याची चव अप्रतिम आहे. याशिवाय आणखी एक युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, थोडी वॉशिंग पावडर पण टाकायला हवी होती.