जोनाथन असे नाव असणाऱ्या कासवाने, सेंट हेलेना नावाच्या बेटावर [island of St. Helena] आपला १९१ वा वाढदिवस साजरा केल्याचे गिनीज बुकच्या एका व्हिडीओमधून आपल्याला समजते. परंतु, त्यांच्याच एका विधानामध्ये गिनीज बुक असे म्हणतात की, पूर्व आफ्रिकेमधील सेशेल्स [Seychelles] मधून जोनाथनला जेव्हा १८८२ साली सेंट हेलेना या बेटावर आणले गेले, तेव्हा हे कासव किमान ५० वर्षांचे तरी असेल आणि म्हणून या कासवाचे नेमके वय काय हे सांगता येणार नाही. जोनाथन ज्या जातीचे कासव आहे, त्या जातींची कासवे साधारण १५० वर्षांपर्यंतच जिवंत राहू शकतात. परंतु, जोनाथनने मात्र तो आकडा केव्हाच पार केला असून आता तो आपला १९१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

जोनाथन हा अजूनही अतिशय निरोगी असल्याचे त्याच्या पशुवैद्याने म्हणजेच जो होलिन्स यांनी गिनीज बुकला दिलेल्या माहितीत सांगितले आहे.


“जोनाथनची वास घेण्याची क्षमता कमी झाली असून, त्याला मोतीबिंदूमुळे काहीही दिसत नाही. असे असले तरीही त्याची भूक मात्र अजूनही व्यवस्थित शाबूत आहे. त्याला आठवड्यातून एकदा हाताने, पौष्टिक फळे आणि भाज्या भरवल्या जातात. यासाठी काही ठराविक माणसांची नेमणूकदेखील केलेली आहे. या आहारातून जोनाथनला केवळ कॅलरीज नाही, तर इतर महत्वाचे पोषक घटक जसे की, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे यांचादेखील पुरवठा होतो. या महाकाय प्राण्याने, या जमिनीवर राहणाऱ्या सर्व प्राण्यांपेक्षा, एखाद्या मनुष्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आहे”, असे होलिन्स यांनी गिनीज बुकला माहिती देताना सांगितले.

हेही वाचा : सोने-चांदी नव्हे, ऑस्ट्रेलियामध्ये झाली चक्क ‘या’ पदार्थाची चोरी; नेमके प्रकरण काय ते पाहा

“जमिनीवर राहणाऱ्या सर्व जीवांपैकी, सर्वाधिक काळ वास्तव्य केलेले जोनाथन हे कासव आपला १९१ वा वाढदिवस साजरा करत आहे”, अशा कॅप्शनसह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाख ४५ हजार इतके व्ह्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच, या व्हिडीओवर २५ हजार लाईक आणि प्रचंड कमेंट्सदेखील आलेल्या आहेत.

नेटकऱ्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे हे पाहा:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने, “वाढदिवसाच्या शुभेच्छा जोनाथन” अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने, “जोपर्यंत पर्यावरण असेच टिकून आहे, तोपर्यंत हे कासव असे निरोगी राहू शकते”, असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “बापरे! जबरदस्त” अशी कमेंट केली; तर शेवटी चौथ्याने, “नायजेरियामध्येदेखील असेच एक कासव होते, ज्याचे वय साधारण २५० वर्ष इतके होते. परंतु, त्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले”, अशी माहिती कमेंटमध्ये दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते.